Kalyan-Dombivli News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मतदारसंघात आढावा बैठका घेत पक्षाच्या मजबुतीकरणासाठी पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरु असून त्या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ पाह्यला मिळत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) हे या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे भोईर हे लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र असून सहापैकी तीन जागांवर भाजपाचे (BJP) वर्चस्व आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे तर अंबरनाथमध्ये शिवसेना तर कळवा मुंब्रा मध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असून येथे भाजपाने आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे ग्रामीण भागात सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. ठाकरे गटाकडून त्यांना कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख पद दिले आहे. भोईर यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवित विजय मिळवला होता.
त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेकडून वेळेवर त्यांचे तिकीट रद्द करत रमेश म्हात्रे यांना दिले गेले होते. यामुळे भोईर हे नाराज होते. ठाण्यातून भोईर यांना कायम डावलले जात असल्याची चर्चा होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर भोईर यांना पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखविण्याची संधी निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठाकरे गटाचा एक चेहरा आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून भोईर यांच्याकडे पाहिले जात आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या मतदार संघाची जागा लढविण्यासाठी सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपाने या मतदार संघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीनेही बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरु होताच ठाकरे गटाकडून भोईर यांच्या नावाला पाठिंबा दिला जात आहे. 2 जून ला भोईर यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर 'आपला भावी खासदार', 'लोकसभा जिंकणारच' अशा शुभेच्छा भोईर यांना कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यामुळे भोईर यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.