
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता पोलिसांनी आंदोलनाशी संबंधित नागपूरमधील 'त्या' व्यक्तीचा छडा लावल्याची माहिती समोर येत आहे. (Silver Oak Attack)
पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यासह अभिषेक पाटील, कृष्णात मोरे, सच्चिदानंद पुरी, चंद्रकांत सुर्यवंशी, ताज्जुदीन शेख आणि इतर आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी नागपूरमधील व्यक्तीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. आरोपींनी आंदोलनठिकाणी आधीच पाहणी केल्याचे सीसीटिव्हीतून स्पष्ट झालं आहे. आंदोलनावेळी सर्वजण सिल्वर ओक येथील गार्डन मध्ये जमले होते. अभिषेक पाटील हा आंदोलकांना मार्गदर्शन करत होता, असं घरत यांनी स्पष्ट केलं आहे.
जयश्री पाटीलही आरोपी
आंदोलनाशी संबंधित काही अॉडिओ क्लिपही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. सुर्यंवशीच्या तपासात रात्री ११ ते पहाटे २:५० पर्यंत सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवर जयश्री पाटील, नागपूरची व्यक्ती, आणि इतरांची बैठक झाली. या बैठकीत जयश्री पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले, त्याही आरोपी असून सध्या फरार आहेत. ८ एप्रिल रोजी सदावर्तेंनी नागपूरच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यावेळी ती व्यक्ती मुंबईतच होती. आंदोलन नागपूरची व्यक्ती हाताळत होती, अशी माहिती घरत यांनी दिली. पण ही व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
सदावर्तेंची डायरी सापडली
सदावर्ते यांनी सर्व पैशांचा हिशोब लिहून ठेवला असून ती डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नागरिकांची लिहिलेली नावे यांची चौकशी होणं गरजेचं आहे. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोतून कामगारांकडून पैसेगोळा केले आहेत. काही एसटी कामगाराचेही पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. या गुन्ह्यात कलम ४०६ आणि कलम ४०९ वाढवलेले आहेत. कोट्यावधी रुपयाचा अपहार झाला आहे, असं घरत यांनी न्यायालयात सांगितलं.
पैशांचा वापर आंदोलनात नाही
सदावर्ते यांनी गोळा केलेल्या पैशांचा वापर आंदोलनासाठी करण्यात आलेला नाही. एसटी कर्मचार्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आहेत. घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. साधारण दोन कोटींच्यावर ही रक्कम आहे. या पैशाचा आंदोलनात वापर केलेला नाही, अशी माहिती घरत यांनी न्यायालयात दिली. यावेळी त्यांनी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीचीही मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.