मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. त्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पटोलेंचा एकेरी भाषेत उल्लेख करत बंगल्यासमोर येवूनच दाखव, तुमच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने आज थेट धडक मारली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून नाना पटोलेंनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खालच्या पातळीची भाषा वापरत फडणवीसांच्या बंगल्यावर येऊन दाखवा असे आव्हान दिले होते. ते स्विकारून काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गनिमी कावा करत फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान ‘सागर’वर थेट धडक मारली. त्यावेळी पोलिसांनी मुस्कटबाजी करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. अतुल लोंढे यांनी सागर बंगल्यावर थेट धडक मारली व परतही आले पण त्यांना आव्हान देणारे प्रसाद लाड मात्र कुठेही त्यांचा प्रतिकार करायला आले नाहीत किंवा दिसलेही नाहीत, असा थेट सवालच अतुल लोंढे यांनी केला.
भाजपासाठी नरेंद्र मोदी देशापेक्षा मोठे असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटत असतील पण आमच्यासाठी देश, महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणून भाडोत्री लोकं उतरवली, त्यांनीच रस्ता जाम केला, त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत पण हे आंदोलन सुरुच ठेवण्याची आमची भूमिका कायम आहे.
"भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला. आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही, आमचे आंदोलन झाले आहे. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. परंतु भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल पण मोदींचे समर्थन करु अशी भाजपाची वृत्ती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना, महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद, नागपूर व भिवंडी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानासमोर नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला. नाना पटोले यांना ते जेथे अडवले तेथेच त्यांनी आंदोलन केले, तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनाही पोलिसांनी अडवले. मात्र प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे यांनी फडणवीसांच्या बांगल्यावर गनिमी काव्याने धडक देऊन महाराष्ट्रद्रोही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचा निषेध केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोदींचा निषेध करण्यासाठी वारकरी परिषदेचे विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारकरी टाळ मृदुंगासह मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.