मुंबई : दहशतवादी याकूब मेमनच्या कबर सजावटीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्योरापांचे राजकारण रंगले आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांच्यावर भाजपने आरोप केले होते. त्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजप नेत्यांचे फोटोच समोर आणले आहेत.
किशोरी पेडणेकर यांनी याकुब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतली, असा आरोप करत भाजपने या बैठकीचा व्हिडीओही जारी केला होता. तसेच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात ज्या याकुब मेमनमुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, त्याच्या नातेवाईकासोबत पेडणेकर बैठक कशा घेऊ शकतात? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे आणि मेमनच्या कुटुंबियांच्या संबंधांची पोलीस चौकशी करावी अशी मागणी भाजपने (BJP) केली होती.
मात्र भाजपची ही चाल ओळखून किशोरी पेडणेकर यांनी भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यानंतर किशोरी पेडणेकरांनी भाजप नेत्यांचे आरोपांचे खंडन करत भर पत्रकार परिषदेत रऊफ मेमनचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोबतचे फोटोच दाखवले. हे फोटो दाखवल्यानंतर आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा सवालही पेडणेकरांनी भाजप नेत्यांना विचारला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "मी तिथे गेले होते हे मी नाकारत नाही, मी बडा कब्रस्तानमध्ये गेले होते पण कब्रस्तानच्या समोर पाणी भरलं असल्याने मी तिथे गेले होते. कोविड काळ असतानाही जिथून जिथून तक्रारी आल्या त्या प्रत्येक ठिकाणी मी भेटी दिल्या. त्यावेळी मी महापौर होते, माझ्या नेत्याने सांगितल्याने त्या बैठकीला मी गेले होते. तिथे ५०-६० लोक होते, पण मी एकालाही नावं विचारलं नाही, संवैधानिक पद असल्याने लोक भेटत असतात, त्यामुळे अशा पदावर असणाऱ्यांना लोकांना भेटावेच लागते. त्यामुळे अशा गोष्टींवर आक्षेप घेण मला शिकवलं गेलं नाही.
मी कष्ट करुन मोठी झाले आहे, तुमच्यासारखे छक्के पंजे करुन मोठी झाले नाही. पण भाजपकडून वारंवार आमच्यावर आरोप केले जात आहेत. पण जर तुम्ही असेच आरोप करणार असाल तर तुम्हीही या फोटोंना उत्तर द्या, असे किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाचा रऊफ मेमन याच्यासोबत त्यांचे फोटो दाखवत पेडणेकर म्हणाल्या, जर माझ्यावर जाणीवपुर्वक आरोप होत असतील तर याच्यावरही फडणवीसांनी उत्तर द्यायला हवे, आरोप करण्यासाठी जी १२ तोंड बसवलीत त्यांनी उत्तर द्या. तुम्ही सत्ता मिळवा पण काम करुन मिळवा, तुमची विश्वासार्हता टिकवून मिळवा, जी शिवसेनेने अनेक वर्षे मिळवली आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.