Pune News : गेली पाच वर्षे राजकीयदृष्ट्या शांत असणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुका जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात अचानक आक्रमक पवित्रा का घेतला? याची उत्सुकता संपूर्ण पुणे जिल्ह्याला आहे. कारण युतीसोबत येऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादांचे मंत्रालयात जाऊन स्वागत करणारे पुरंदरमधील पहिले नेते हे शिवतारेच होते. अगदी बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यापर्यंत सर्व काही सुरळीत असताना शिवतारे यांनी अचानक का उचल खाल्ली, याचा शोध घेतला असता काही प्रमुख कारणे समोर आली आहेत.
यामध्ये नियोजन मंडळाचा निधी, शिवतारेंचे नियोजन मंडळातील कमी झालेले महत्त्व, ‘इंदापूर पॅटर्न’चा धसका आणि खुद्द शिवतारे यांचा पुरंदरमधील कमी झालेला संपर्क, यातून भविष्यात आपले काय, ही चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःचाच जुना पॅटर्न काढून पवारांविरोधातील धार अधिक धारदार केल्याचे मानले जाते. (Latest Marathi News)
शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे राजकारण हे कायम पवारविरोध असेच राहिले आहे. त्यातून गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी ‘तू निवडूनच कसा येतो, हेच मी पाहतो’ असे जाहीर आव्हान त्यांना दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी काँग्रेसचे संजय जगताप यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करून शिवतारे यांचा पराभव घडवून आणला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हीच सल शिवतारे यांच्या मनात कायम होती. कारण अगोदरच्या मंत्रिमंडळात शिवतारे हे राज्यमंत्री होते. त्यामुळे त्या पराभवाचे दुःख शिवतारेंना मोठे होते. पण, त्या गोष्टीला आता पाच वर्षे होत आली आहेत. मधल्या काळात शिवतारेंनी त्याबाबत कुठेही फारशी वाच्यता केल्याचे आढळले नाही, मग त्यांनी आताच अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका का घेतली? याचा धांडोळा घेतला असता काही ठळक घडामोडी प्रकर्षाने पुढे आल्या आहेत.
चंद्रकांत पाटील जोपर्यंत पुण्याचे पालकमंत्री होते, तोपर्यंत शिवतारे यांचा नियोजन मंडळात दबदबा होता. अगदी भांडून ते आपल्या कार्यकर्त्यांच्या विकासकामांना निधी मिळवून द्यायचे. मात्र, अजित पवार पालकमंत्री होताच शिवतारेंचे नियोजन मंडळातील महत्त्व कमी झाले. त्यातच मार्चच्या पहिल्या आठवड्यात नियोजन मंडळाच्या निधीची यादी येताच शिवतारे यांच्या संतापाचा भडका उडाला. कारण त्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत शिवतारे यांना निधी मिळाला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि मागील 2019 च्या निवडणुकीतील विधानाची आठवण करून ‘पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे,’ असा कार्यकर्त्यांसमोर इशारा दिला.
दुसरीकडे, अजित पवार यांनी जिल्ह्यातील जातीय समीकरणांचा समतोल साधण्यासाठी पुरंदरमधील नेत्यांना बळ द्यायला यापूर्वीच सुरुवात केली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि तत्पूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडीपासून अजितदादा कामाला लागले होते. विधानसभेचे गणित डोळ्यांसमोर ठेवूनच प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची, पुरंदर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब कामथे यांच्याकडे सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा दिल्याचे मानले जाते.
पालकमंत्री झाल्यापासून अजितदादांनी (Ajit Pawar) पुरंदरमधील एका नेत्याला विधानसभेच्या दृष्टीने तयार करण्यास सुरुवात केली आहे. इंदापुरात ज्याप्रमाणे दत्तात्रेय भरणे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करून त्या माध्यमातून आमदारकीची तयारी करण्याच्या दृष्टीने बळ दिले, त्याच ‘इंदापूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती पुरंदरमध्ये होण्याची धास्ती शिवतारे यांना आहे. सध्याचे महायुतीमधील जागावाटप आणि गुंता पाहता विधानसभेला हे तीनही पक्ष एकत्र लढतील का, हा खरा प्रश्न आहे, त्यातूनच आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम महायुतीमध्ये सुरू आहे. महायुती एकत्र लढली तरीही भरणे यांना इंदापूरमधून जसे अपक्ष उभे करून निवडून आणले, तसे पुरंदरमध्ये होणारच नाही असे नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी थेट संबंध होता. अगदी मंत्री झाल्यानंतरही ते कायम मतदारसंघात सक्रिय असायचे. संघटन पातळीवरही तालुक्यात शिवसेना अन्य पक्षांच्या तुलनेत विस्कळीत दिसून येते. शिवाय शिवसेना फुटीमुळे संघटनेची ताकदही विभागली गेली आहे. मध्यंतरी केलेल्या उपोषणामुळे शिवतारे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागते. तसेच, कोविड (Covid) काळात त्यांचा तालुक्याशी संपर्क नव्हता, असा आरोप त्यांच्यावर होतो आहे. या सर्व कारणांमुळे शिवतारे यांना भविष्याची चिंता सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी थेट अजित पवार विरोधाचे 'भावनिक' हत्यार उपसले आहे. यातून पुरंदरकरांची सहानुभूती मिळेल, अशी त्यांची अटकळ असावी.
सध्या पुरंदर तालुक्यात पाणी आणि चाराटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी आणि पशुपालक हे पाणी आणि चाऱ्याची सोय कशी करायची, या चिंतेत आहेत. मात्र, राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीचे पडलेले आहे. उन्हाळ्याचे आणखी दोन ते अडीच महिने आहेत, ते कसे काढायचे, याची भ्रांत सर्वसामान्यांना असताना पाणी आणि चाऱ्याचे नियोजन ना प्रशासकीय पातळीवर होताना दिसत आहे, ना राजकीय पातळीवर. याशिवाय तालुक्याचा प्रशासकीय कारभार ‘प्रभारीं’वर आहे, त्यांच्याकडे जनतेच्या प्रश्नासंदर्भात जोर लावणे गरजेचे आहे. बहुचर्चित गुंजवणी पाणीप्रश्न अद्याप लोंबकळतच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या निवडणुका सत्ताधाऱ्यांसाठी जरा अवघडच ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Edited By - Chetan Zadpe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.