संजय परब-
Maharashtra Politics Latest News : आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात 400 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असून महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा त्यांना जिंकायच्या आहेत. हे लक्ष्य त्यांनी वर्षभरापूर्वी निश्चित केले असून हे टार्गेट गाठण्यासाठी आता त्यांनी मित्रपक्षांना कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे ज्यांना हे जमणार नाही त्यांनी विषय हार्ड न करता सोडून देण्यासही भाजपने सुचवल्याचे समजते. याची सुरुवात त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून केली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाही तर कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असे स्पष्ट सांगितले असल्याचे कळते.
दुसरीकडे, कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा म्हणजे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असून यावर सुद्धा भाजपने दावा केला असून यामुळे युतीत धुसफूस सुरू आहे. शेवटच्या क्षणी आम्ही तुम्हाला ही जागा देतो, पण कमळ हातात घ्या, असे भाजप शिंदेंना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
भाजप कधीही कुठलीही गोष्ट लगेच ठरवत नाही. त्यांच्या पुढच्या योजना या एखादे लक्ष्य गाठल्यानंतर लगेच सुरू होतात. 2024 च्या लोकसभेची तयारी त्यांनी कधीच सुरू केली असून वर्षभरापूर्वी त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. दक्षिणेत, पूर्वेत भाजपला यश मिळत नसल्याचे दिसताच त्यांनी उत्तर भारताप्रमाणे पश्चिम भारतात शत प्रतिशत भाजप या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली असून पश्चिम बंगाल, बिहार हाती येत नाही हे लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष देताना 45 जागा कुठल्याही परिस्थितीत मिळाल्या पाहिजेत, असा निश्चय केला आहे.
यासाठी आधी शिंदे आणि नंतर अजित पवार यांना हाताशी घेतले आहे. आता फुटीर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा जागा हव्या असतील तर त्यांच्यावर कमळ चिन्हाचे बंधन असेल. शेवटी या फुटीर पक्षांना भाजपची गरज आहे, भाजपला त्यांची गरज नाही, असा अप्रत्यक्ष दिलेला हा इशारा आहे. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुद्धा लोकसभेच्या विधानसभेत अधिक रस असून कमळ तर कमळ असे म्हणून ते शेवटच्या क्षणी तलवारी म्यान करतील, असे सध्याचे वातावरण आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिवाळी अधिवेशनानिमित्त भाजपची चिंतन बैठक झाली असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते. या बैठकीत मित्रपक्षांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे आदेश द्या, असे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा तसा दावा केलाय. 2024 ला महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची असेल त्यांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असे ट्विट आव्हाडांनी केले आहे.
‘दुसऱ्या पक्षातील नेते माझे मित्र असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप तीन राज्यात जिंकल्यानंतर जोरात आहे. स्वत: निवडणूक जिंकू असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे त्यांची संघासोबत बैठक झाली. स्वबळावर लढवावी अशी इच्छा आहे. डाग लागलेले मंत्री बाजूला सारून निवडणूका लढवणार आहेत. शिंदे गटाचे बरेच खासदार कमळावर लढणार आहेत. भाजपचा मूळ मतदार रागावला होता. तो हे जवळ आल्याने लांब गेलाय. लढायचं असेल तर कमळावर लढा नाही तर सोडून द्या. संघ आणि भाजप पाच वर्षांपुढची तयारी करतात. त्यांचे सर्वे झालेत. बैठक झाली याचा सोर्स सांगणार नाही. त्यांच्या काही मंत्र्यांमध्ये ही चर्चा मी ऐकली. लोकसभा एकत्र लढतील, विधानसभा मात्र वेगळे लढतील’, असे आव्हाड म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.