कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे लढणार हे जवळपास निश्चित झालेले असतानाच आता आणखी एक चर्चेचे या मतदारसंघातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे कल्याण लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित असताना आनंद परांजपे यांचे नाव पुढे आल्याने पडद्यामागून काहीतरी राजकारण शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी (Kalyan Loksabha Constituency) भाजप आग्रही असल्याची सुरुवातील चर्चा होती. त्यावेळी भाजपचे रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) तसेच किसन कथोरे (Kisan Kathore) यांचा नावे पुढे होती. तसेच याच मतदारसंघातील मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी अनेकदा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर टीका करून शिंदेंना जेरीस आणले होते. त्यामुळे कल्याण लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांचा मार्ग काहीसा अवघड वाटत होता. मधल्या काळात सर्व वाद थांबले आणि श्रीकांत शिंदेच लढणार, हे जवळपास नक्की झाले. अशातच आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे (Anand Paranjpe) कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्याच्या तयारीत असून त्यासाठी ते अपक्ष म्हणून मैदानात उतरतील अशी चर्चा सुरू झाली आहे. (Loksabha Election)
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहेत. कल्याणमध्ये त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत तर ठाणे हा त्यांचा मतदारसंघ आहे. शिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघ हा दिवंगत आनंद शिंदे यांनी भाजपकडून खेचून आणलेला मतदारसंघ आहे. आता ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला पुन्हा ताब्यात हवा आहे तर भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या गोळीबार प्रकरणानंतर भाजपने कल्याण मतदारसंघात प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील हवा अशी असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद परांजपे यांचे नाव अचानक पुढे आले आहे. या मतदारसंघातील भूमीपुत्र, ब्राम्हण समाज, नामवंत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, अनेक गावांमधील लोकप्रतिनिधींनी परांजपे यांची भेट घेतली आहे. एवढेच नाही तर आनंद परांजपे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची गळ घातल्याचे कळते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कल्याण लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघातून विजयी होण्याचा पहिला मान आनंद परांजपे यांनी मिळवला होता. त्यावेळी ते शिवसेनेत होते. खासदार म्हणून या मतदारसंघातील अनेक कामे त्यांनी केली. त्यांचा जनसंपर्क उत्तम राहिला आहे. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिक त्यांच्यावर नाराज झाले होते. तरीही त्यांच्यासोबत जाणारा एक गट आहे. शिवाय परांजपे यांना भाजपचा छुपा पाठिंबा मिळू शकतो, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही.
शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी आनंद परांजपे यांना राजकारणात आणले. त्यावेळच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक यांचा पराभव केला होता. पुढे 2009 मध्ये लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर आनंद परांजपे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उतरवण्यात आले आणि ते विजयीही झाले.
दरम्यान, 2012 मधील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही बाब एकनाथ शिंदे आवडली नाही. पुढे 2014 मध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी देत आनंद परांजपे यांचा पराभव केला. तर 2019 मध्येही आनंद परांजपे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून मोठा पराभव सहन करावा लागला.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.