Thane News : लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विद्यमान खासदार राजन विचारे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षात या जागेवरून तिढा आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटात या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे असल्याने या जागेवर भाजपचा डोळा आहे, तर दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही, या भूमिकेत शिवसेना शिंदे गट आहे. या जागेवरून दोन्ही पक्षात ‘तह’ होण्याची शक्यता असल्याने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चेहर्यांची चिंता वाढली आहे. (Lok Sabha Election News)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील दहा दिवसांत केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप प्रवेश केल्यानंतर पुन्हा खासदारकीची संधी मिळेल, या अपेक्षेने माजी खासदार संजीव नाईक मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरवर त्यांची असलेली पकड ही जमेची बाजू आहे, तर दुसरीकडे कट्टर संघविचारी असलेले आणि केंद्राशी जवळीक असलेले विनय सहस्रबुद्धे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेते प्रयत्नशील आहेत.
महायुतीचा आताचा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही सुरुवातीला माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा होती, पण आता त्यांना राज्यसभेवर जाण्याचे वेध लागल्याने निवडणुकीच्या रिंगणात ते उतरण्याची शक्यता धुसर झाली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने या लोकसभा मतदारसंघातील आपला दावा सोडलेला नाही. माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात आहे.
२०१४ मध्ये शिवसेना भाजप अशी युती होती. या वेळी मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे हे विजयी झाले. त्यांनी त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजीव नाईक यांचा २ लाख ८१ हजार २९९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी नाईक साम्राज्यासमोर उभे राहण्यास कुणी तयार नसताना राजन विचारे यांनी ही हिंमत दाखवली होती. २०१९ मध्ये विचारे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा तब्बल चार लाखांच्या मतांनी पराभव केला होता. या वेळी विचारे यांच्या मतांमध्ये वाढ झालेली पाहावयास मिळाली.
शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी आणि आता भाजप (Bjp)असा प्रवास करणारे गणेश नाईक (Ganesh Naik) यांचा स्वतःचा एक दबदबा आहे. एकेकाळी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचा दरबार गाजायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ पासूनच त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये गेल्यानंतरही ही स्थिती सुधारलेली नाही. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याचेही दिसते. मध्यंतरी महायुतीच्या निर्धार मेळाव्यात गणेश नाईक यांना बोलू दिले नव्हते. त्यामुळे या ठिकाणचा तिढा कसा सोडवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
R