Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, तरीही अद्याप राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशातच राज्यातील राजकारणात दररोज नवनवीन आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. एकीकडे रासपचे नेते महादेव जानकार (Mahadev Jankar) हे अचानक महायुतीमध्ये सामील झाले, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedka) यांनी आघाडीत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात होणाऱ्या याच घडोमोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. या वेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असावेत, असं वक्तव्य केलं आहे. मात्र, आंबेडकर सोबत नसले तरीही आघाडीचाच विजय होणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सन्मानीय नेते असून, ते आमच्यासोबत असावेत अशी आमची इच्छा आहे. आमचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. उद्या शिवसेनेची पहिली यादी (Shivsena List) जाहीर करणार आहे. प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते, ते आमच्या बरोबर राहावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे, आघाडीत 4 ते 5 पक्ष आहेत. त्यामुळे वंचितला आम्ही त्यांनी मागितलेल्या 4 जागांचा चांगला प्रस्ताव दिला आहे. आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत, त्यांचं संघटन मोठं आहे, असंही राऊत म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पत्रकारांनी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आंबेडकर सोबत नाहीत हे दुर्दैवी असल्याचं वक्तव्य राऊतांना सांगताच राऊत म्हणाले, "आंबेडकर सोबत असले आणि नसले तरीही आम्ही जिंकू. आघाडीच्या मागे लोकमत आणि जनमत आहे. परंतु आंबेडकर सोबत असते तर आमचा विजय देदीप्यमान झाला असता. मात्र याचा अर्थ असा नाही की, आम्ही परावलंबी नाही. आमच्यासाठी आंबेडकर सन्मानीय आहेत, आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चा केली, वारंवार विनंती केली. त्यांनी हा प्रस्ताव मान्य करायला पाहिजे होता. मात्र आम्ही आशा सोडलेली नाही."
या वेळी बोलताना राऊतांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. भारतीय जनता पक्ष कधीच मोठा नव्हता, एखादा दरोडेखोर चोऱ्यामाऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे. त्याप्रमाणे भाजपचं आहे, दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून संपत्ती वाढवणं याला श्रीमंत किंवा धनिक मी मानत नाहीत. यात विशेष काय आहे? दुसऱ्यांचे पक्ष विकत घेऊन भाजप मोठा झाला आहे. आमच्याकडे सत्ता आल्यावर तुमचा पक्षदेखील राहणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर टीका केली.
महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) महायुतीत प्रवेश केल्याच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, "जानकरांची शरद पवारांबरोबर (Sharad Pawar) चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी महायुतीत प्रवेश केला. अशा लोकांना काही विचारधारा नसते, जिथे खायला मिळेल तिथे ते जातात. ते आघाडीत येणार होते चर्चा सुरू होती, अशात त्यांनी देवेंद्र फडणवीसांची गळाभेट घेतली."
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.