बारामती लोकसभा मतदारसंघात ( Baramati Lok Sabha Election 2024 ) राज्यातील सर्वाधिक 'हाय व्होल्टेज' लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी ही निवडणूक अस्तित्वाची असणार आहे, तर अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तरी त्यापूर्वीपासूनच सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या कामाला लागल्या असल्याचं पाहायलं मिळालं आहे.
सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) यंदा खडकवासला मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळत आहे. मागील तीन लोकसभा निवडणुका सुप्रिया सुळेंनी चांगल्या मताधिक्यांनी निवडून आल्या असल्या तरी खडकवासला मतदारसंघातून मात्र त्या पिछाडीवरती असल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. मागील दोन निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंघ असतानासुद्धा खडकवासला मतदारसंघातून सुळेंना कमी मताधिक्य मिळालं होतं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत खडकवासल्यातून भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी 70 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. सुप्रिया सुळेंना 85 हजार 993 मते, तर कुल यांना 1 लाख 52 हजार 487 अशी विक्रमी मते मिळालेली. 2014 च्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांनी ( Mahadev Jankar ) सुळेंपेक्षा 20 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सुळेंना 70 हजार 602 मते, तर जानकरांना 98 हजार 729 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत जानकर भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढले नव्हते. नाहीतर चित्र अजून काहीच वेगळं असतं, असं बोललं जातं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे वर्षभरापासून सुप्रिया सुळे खडकवासला मतदारसंघात सातत्यानं दौरे करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी विविध नागरिकांच्या प्रश्नांवरती आंदोलनंदेखील केली. सातत्याने नागरिक प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून सुप्रिया सुळे या सातत्याने शनिवार आणि रविवार खडकवासला मतदारसंघांमध्ये तळ ठोकून असल्याचं दिसून येत आहे. विविध मेळावे आणि कार्यक्रमही सुळेंनी सोसायट्यांमध्ये घेतले आहेत. खडकवासल्यातील छोट्या कार्यक्रमांनाही सुळे हजेरी लावताना दिसत आहेत.
इंदापूर आणि पुरंदरमधून मित्रपक्षातील नेत्यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटलं आहे. त्यामुळे अजितदादांसाठी खडकवासला मतदारसंघ अत्यंत आवश्यक असणार आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. तरी, सुनेत्रा पवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
खडकवासला मतदारसंघात काही ठिकाणी सुनेत्रा पवारांनी भेट दिली. भाजपनं सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला असला, तरी अजित पवारांचे काही मोजकेच पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. सुनेत्रा पवार किंवा अजितदादा प्रचाराला आले, तरच पदाधिकारी सक्रिय होतात, अन्यथा बाकीवेळी फिरकतसुद्धा नाहीत. त्यामुळे प्रचाराला वेग येताना दिसत नाही. याचा फटका आगामी निवडणुकीत अजित पवार गटाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खडकवासल्यात मतदारांची संख्या किती?
खडकवासला हा शहरी व ग्रामीण, असा संमिश्र मतदारसंघ आहे. पश्चिम हवेली, सिंहगडच्या ग्रामीण भागाचा अपवाद वगळता शहरी भागात सुळेंना अधिक मतदान मिळाले नाही. ग्रामीण भागातील मतदार केवळ 30 टक्केच आहे, तर शहरी मतदार 70 टक्के आहेत. खडकवासला मतदारसंघात एकूण 5,21,209 एवढे मतदार आहे. त्यामध्ये 2,77,659 पुरुष आणि 2,43,511 महिला, 39 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.