Shiv Sena : फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली ; शिवसेनेचं टीकास्त्र

maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत.
maharashtra cabinet expansion
maharashtra cabinet expansion sarkarnama
Published on
Updated on

पुणे : सत्ता स्थापनेनंतर ४० दिवसांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल (मंगळवारी) झाला. तो एवढा का लांबवला याच्या अनेक शक्यता उघडपणे चर्चिल्या जात होत्या. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली. 'सामना'च्या अग्रलेखातून महाभारताचा संदर्भ देत शिंदे-फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. (maharashtra cabinet expansion latest news)

शिंदे सरकारने मंत्रिमंडळात आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांना स्थान दिले आहे. या दोघांवर काही घटनांमध्ये आरोप असतानाही मंत्रिमंडळात घेतल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून टीका करण्यात आली आहे

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मविआ सरकारमधून मंत्रिपद गमावलेले दिग्रसचे आमदार संजय राठोड व टीईटी घोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरुन शिवसेनेने सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

“किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामीच आहे”, असे अग्रलेखात म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत, असा सवाल अग्रलेखात उपस्थित केला आहे.

maharashtra cabinet expansion
भाजप-शिंदे समर्थकांत वादाची ठिणगी ? ; नाराज आमदारांना सांभाळण्यासाठी शिंदेंची कसरत

राज्याच्या कल्याणासाठी नक्की काय करणार आहे? शिंदे गटाचे जे लोक मंत्री झाले ते महाविकास आघाडीतही मंत्री होतेच. त्यातील राठोड यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप भाजपनेच केले होते. भाजपच्या आरोपांमुळेच राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले होते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात राठोड यांना सळो की पळो करून सोडले. आता तेच राठोड फडणवीस यांच्या मांडीस मांडी लावून बसतील, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलयं..

क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?

अखेर 40 दिवसांनंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले, पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही. भाजप व शिंदे गट मिळून 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता. फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता,

लोकशाही व घटनेचा खून

राज्यपाल महोदयांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपथ दिली व आता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे. शिंदे व त्यांच्या गटावर पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईची तलवार लटकते आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना त्यातील काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणे हा लोकशाही व घटनेचा खून आहे, पण असे खुनी सध्या देशभरात मोकाट सोडून त्यांच्या माध्यमातून राज्य चालवले जात आहे.

विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय?

राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा अशा मंडळींनी भाजपकडून शपथा घेतल्या. शिंदे गटाकडून संदिपान भुमरे, संजय राठोड, दादा भुसे, गुलाब पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत, शंभुराज देसाई, दीपक केसरकर अशांचे घोडे गंगेत न्हाले, पण गंगेत डुबकी मारून तरी यांच्या विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय? ज्यांच्या पाठीवर मंत्रिपदाची झुल पडली ते आनंदात असले तरी हा त्यांचा आनंद औटघटकेचाच ठरण्याची आम्हाला खात्री आहे.

गद्दारीचा कलंक पुसला जाणार नाही

पुन्हा विश्वासघाताची उडी मारूनही ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत त्यांचे समाधान कसे करणार? इकडे काय किंवा तिकडे काय आहेत. यातले अनेक जण ‘ईडी’च्या भयाने कातडी वाचविण्यासाठी बेइमान झाले. त्यांना सर सलामत राहिले याच लेनदेनवर दिवस ढकलावे लागतील. मात्र त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा कलंक कधीच पुसला जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे? महिनाभरात त्यांना दिल्लीत सात हेलपाटे मारावे लागले तेव्हा कोठे काल मंत्रिमंडळाचा विस्तार ते करू शकले.

सत्तार यांना मंत्री केलं..

भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून त्यांना स्वच्छ करण्यात आले. गिरीश महाजनांची मारहाण, खंडणी, अपहार अशी प्रकरणे सीबीआयकडे आहेत. म्हणजे घरच्या घरीच चौकशी सुरू आहे. अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबियांचे नाव ‘टीईटी’ घोटाळ्यात आले. तरीही शिंदे यांनी सत्तार यांना मंत्री केले. नाही तर सत्तार यांनी शिंदे गटाचाही त्याग करायला मागेपुढे पाहिले नसते. विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप आहेत.

  • जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध चिमण पाटलांत ‘राडा’ होणारच आहे.

  • सावंतवाडीत दीपक केसरकर यांची लायकी राणेंच्या मुलांनी काढल्यावर केसरकर कोशात गेले आहेत.

  • शिंदे यांनी कोशातून बाहेर काढून केसरकरांना मंत्रिपदाची शपथ दिली.

  • सिंधुदुर्गात राणे विरुद्ध केसरकर या जुन्याच भांडणाला नवा रंग चढेल.

  • शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या दोन्ही बाजूंचे नऊ-नऊ असे मंत्री घेतले. हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com