
जयंत पाटील यांचा राजीनामा: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या निरोप समारंभात भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
जितेंद्र आव्हाड यांचे भावनिक भाषण: आव्हाडांनी जयंतरावांच्या संयमी स्वभाव, निष्ठा, नेतृत्व कौशल्य आणि मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचा गौरव करत सर्व सभागृह भावनिक केलं.
पुरोगामी मूल्यांशी बांधिलकी: जाती-पातीच्या संघर्षाच्या काळातही जयंत पाटील यांनी सर्व समाजाला सोबत घेण्याची भूमिका घेतली आणि शरद पवारांच्या विचारांना साथ दिली.
Jayant Patil:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा निरोप समारंभात पक्षाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणात सारं सभागृह भावनिक झाले.
आपल्या भाषणात आव्हाडांनी जयंतरावांचा राजकीय प्रवास, त्यांची काम करण्याची शैली, नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता, सत्ताधाऱ्यांना शालजोडे मारमारा नेता, मुख्यमंत्री पदाची क्षमता असलेला नेता, यावर चपलखपणे भाष्य केलं. आव्हाडांचे हे भाषण ऐकताना सारं सभागृह भावनिक झाले होते. आव्हाडांचा एक-एक शब्द ऐकताना जयंतराव भावुक झाले होते.
जयंत पाटलांच्या डोळे कधी पाणावले हे कधीच कळलंच नाही, असे हे जयंत पाटील आहेत.राजकारणात नेमका माणूस कसा असावा, असे जर मला कुणी विचारले तर महाराष्ट्रात माझ्यासमोर एकच नाव असते ते म्हणजे जयंत पाटील. जयंतरावांना तुम्ही कधी रागावलेलं पाहिलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना राग येत नाही. त्यांनाही राग येतो, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेतील एका घटनेची आठवण करुन दिली.
सभागृहात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यावेळेचा शिवसेनेचा एक ज्येष्ठ नेता जयंतराव पाटील यांच्या जवळ आला, त्याने नकळत जयंतरावांना शिवी दिली. त्यानंतर जयंतराव यांच्यातील वाघ जागा झाला, आख्ख सभागृह गार पडलं. त्या शिवसेना नेत्याला उपस्थितांना मागे खेचले,अशी आठवण आव्हाडांनी सांगितली.
भविष्यात महाराष्ट्राचा सीएम होण्याची ताकद जर कुणात असेल ना तर ती जयंत पाटलांच्यामध्ये आहे. सीएम होण्याची क्षमता असणारा जयंतराव हा एकमेव नेता आहे, असे सांगत आव्हाडांनी जयंतरावांच्या कार्यशैलीचं, क्षमतेचं कौतुकं केले.
ओबीसी समाजाला सोबत घेऊन आपल्याला पक्षसंघटना बांधायची आहे, हे सांगायला ताकद लागते. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या जाती-पातीच्या राजकारणात असे म्हणणारे धाडस करणं अवघड आहे. सर्व समाजाला एकत्र घ्यायचं, अल्पसंख्यांकांना एकत्र घ्यायचं असे म्हणणारे जयंतराव आहेत.
एकीकडे अल्पसंख्यांना घाबरवायची स्पर्धा लागली असताना मराठ्याच्या विरोधात ओबीसींना पेटवण्याची स्पर्धाही लागली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला, यामुळे सरकारची भूमिकाच स्पष्ट झाली. या सरकारला पुरोगामी विचार दाबायचा आहे. देशात पुरोगामी विचाराचा सर्वात मोठा आवाज हा शरद पवार आहे. त्यांचे बोल कायम मुखात ठेवणारा कुणी माणूस असेल तर ते जयंतराव आहेत.
जयंतरावांची निष्ठा महाराष्ट्र कायमच लक्षात ठेवेल. ज्यांना सगळं दिले त्यांनी बंड केले, बंड झाल्यावर थंड करुन मेवा खायला दिला ते पळून गेले, पण जयंतरावांनी शरद पवारांची साथ कधी सोडली नाही. महत्वाकांक्षा सर्वांना असतात, पण त्यासाठी स्वत:च्या बापाच्या पेकाटात लाथ घालणार नाही, हा जयंतरावांचा विचार आहे, त्यांच्या विचाराचा सन्मान महाराष्ट्र नेहमीच करेल. जयंतराव किती वेळा महाराष्ट्रात फिरले, किती वेळा मन मारुन जगले, हे मी पाहिले आहे.त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्या त्यांनी कधीच ओलांडल्या नाहीत, असे आव्हाड म्हणाले.
शब्द राखून बोलण्याची त्यांची सवय मला आत्मसात करायची आहे. त्यांच्याकडून मला संशय शिकायचा आहे. मला त्यांचा विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल, आयुष्यात मी त्यांच्याशिवाय कुणालाही नेता मानला नाही, त्यांना मला नेता मानण्यात धन्यता वाटते. खरा नेता कसा असतो या व्याख्येत जयंतराव बसतात. 45 वर्ष त्यांनी पक्षात काम केले, नेतृत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक युवकांना संधी दिली. चांगले तरुण हेरून त्यांना पक्षात काम करण्याची, नेतृत्व करण्याची संधी दिली. नेतृत्वं कसं तयार करायचं हे महाराष्ट्राला शरद पवारांनी शिकवलं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम जयंत पाटलांनी केले, अशा शब्दात आव्हाडांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
आमच्या पक्षाला जयंत पाटलांसारखा नेता मिळाला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. विधानसभेत सत्ताधाऱ्यांशी बोलताना त्याचे शालजोडीतील टोले सर्वांना माहीत आहे. पक्षाच्या कठीण काळात पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे काम जयंत पाटलांनी केले, तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही, अशा भावना आव्हाडांनी व्यक्त केल्या.
'अनेक ऑफर त्यांना येतील, पण पुरोगामीचा झेंडा त्यांच्या वडीलांनी त्यांच्या खांद्यावर दिला, तो झेंडा ते कधीच खाली टाकणार नाहीत.शरद पवार यांचा विश्वास ते सार्थ ठरवतील. जाती-पातीच्या लढाई काम करीत असताना सर्वांना माहीत आहे की एक माणूस आमच्या कामाला येईल, ते म्हणजे जयंत पाटील, असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला.
बदल हा निर्सगचा नियम आहे. तुमचं नेतृत्व आम्ही मनापासून स्वीकारलं. तुम्ही जे पवार साहेबांना दिले ते आम्ही कधीच विसरणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारा एकमेव नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो, अशा भावना व्यक्त करीत आव्हाडांनी त्यांना राजकारणातील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.