
रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती: कोकणात भाजपचा विस्तार साधण्यासाठी व नारायण राणे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राजकीय डावपेच: ठाणे जिल्ह्यात मजबूत संपर्क आणि फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या चव्हाण यांच्याकडून कोकणात भाजपला नवसंजीवनी देण्याची अपेक्षा आहे.
स्थानिक राजकारणातील हालचाली: नारायण राणे, भरत गोगावले, आणि भास्कर जाधव यांच्यातील मतभेद आणि हालचाली कोकणातील राजकारणात नवे समीकरण निर्माण करत आहेत.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमागील अनेक समीकरणांमध्ये कोकणातील नेत्याला संधी देणे, हा एक प्रमुख मुद्दा होता. शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या कोकणावर प्रभुत्व मिळविले, तर मुंबईवर सत्ता मिळविता येईल, या कयासातून भाजपकडून कोकणामध्ये विस्ताराचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार नारायण राणे यांना संधी दिल्यानंतरही, भाजपमधूनच त्यांना विरोध झाल्यामुळे भाजपने आता चव्हाण यांच्या रूपात नवी चाल खेळली आहे.
सध्याच्या राजकारणात ‘मॅच फिक्सिंग’ हा शब्द वापरला जात असला तरी भाजपने कोकणात बुद्धिबळाचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. आपली राजकीय चाल यशस्वी करण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कोकण विभागात आपला नवीन राजा पुढे सरकवला आहे, तो म्हणजे रवींद्र चव्हाण. त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती ही कोकणात भाजपला घट्ट स्थान मिळवून देण्यासाठी आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी एक फासा मानला जात आहे. खरेतर शिवसेनेची कोकणातील ताकद कमी करण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना जवळ केले होते; पण आता शिवसेनेचे दोन गट झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुका आटोपल्या आहेत. राणे यांची फारशी उपयुक्तता राहिलेली नाही. त्यामुळे कोकणचे सुपुत्र अशी ओळख असलेले रवींद्र चव्हाण यांना पुढे करून भाजप कोणती चाल खेळणार, हे पाहावे लागेल.
भांडुपच्या चाळीत राहून पुढे डोंबिवलीतून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे चव्हाण यांच्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. भाजपचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. चव्हाण यांचे ठाणे जिल्ह्यातील काम, संयमित व शिस्तबद्ध शैली आणि कार्यकर्त्यांशी संवाद हे सारे गुण संघटना मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. विशेष म्हणजे, चव्हाण यांचा पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुसंवाद होता; तसाच आता तो शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही आहे. किंबहुना ठाण्यात त्यांनी शिंदे यांच्या मर्जीत राहूनच आपली राजकीय ताकद वाढवली, असे बोलले जाते.
आपला राजकीय आलेख चढा ठेवण्यासाठी चव्हाण यांनी सोयीप्रमाणे लवचिकताही अवलंबवली. पूर्वी ते विनोद तावडे यांचे समर्थक मानले जात होते; पण २०१४मध्ये तिसऱ्या फळीत असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षावर ताबा मिळवला आहे. साहजिकच चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले. शिवसेना फुटली त्या वेळी चव्हाण यांचे ‘मोलाचे कार्य’ सर्वांना ज्ञात आहेच. त्यामुळे ज्याप्रमाणे पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीने चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले, तशीच संधी रवींद्र चव्हाण यांनाही मिळाली; पण केवळ फडणवीस यांच्या मर्जीतील आहेत, हे एकमेव कारण त्यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीमागे नाही, तर कोकणात मंदावलेल्या भाजपमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे आणि त्याआडून मुंबईवर राज्य करण्याची खेळी आहे.
कोकणात शिवसेनेने सुरुवातीलाच शिरकाव केला. मुंबईत चाकरीसाठी गेलेला मराठी माणूस हा बहुतांश कोकणी होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव प्रचंड होता. तसा कोकणी माणूस हा संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथील राजकारणही भावनिक मुद्द्याभोवती फिरते. त्यामुळे बाळासाहेबांनी मुंबईचा पहिला महापौर निवडला तो कोकणी माणूस. आता हा सर्व इतिहास झाला आहे. वर्तमान आणि भविष्यात देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई काबीज करायची असेल तर कोकण ताब्यात हवे, हे भाजपला उमगले आहे. त्यामुळे कोकणात मंदावलेल्या भाजपला नवीन ऊर्जा देण्यासाठी चव्हाण हा चेहरा देण्यात आला आहे.
खरेतर यापूर्वी नारायण राणे यांना यासाठीच भाजपने पक्षप्रवेश देत केंद्रीय मंत्रिपदही बहाल केले; पण केंद्रात राणे यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना घेरण्याचा प्रयत्न राणे यांनी केला. यात त्यांच्या दोन्ही सुपुत्रांचाही सक्रिय सहभाग होता; पण या चिखलफेकीत भाजपचीच प्रतिमा डागाळू लागली. आताही राणे सुपुत्रांच्या वक्तव्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वेळा अडचणीत आले आहेत; पण मुद्दा हासुद्धा नाही. राणे यांचे कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग असले तरी त्यांचा प्रभाव संपूर्ण कोकणात आहे. एकाधिकार सत्तेप्रमाणे त्यांचे वागणे असल्यामुळे भाजपच्या छावणीतच राणे गटाला हटवा, अशी कुजबूज सुरू आहे. त्यातूनच रवींद्र चव्हाण हा पर्याय पुढे आला आहे.
नारायण राणे यांना चारही बाजूने घेरून त्यांना एकटे पाडण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे आक्रमक चाल खेळत आहेत. नारायण राणे यांनी पक्षासाठी ‘मर्डर’ केल्याचे वक्तव्य नुकतेच भरत गोगावले यांनी केले होते. राणे यांनी त्याकडे फारसे लक्ष न देत सत्तेच्या हवेत हरवलेले लोक असा टोला लगावला; पण त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. भरत गोगावले आपल्या वक्तव्यावरून अडचणीत येतील, असे भासवण्यात आले. वास्तविक गेल्या दहा वर्षांपासून रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे, या आशेत गोगावले आहेत. त्यांचे हे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. गोगावले यांच्या वक्तव्याचे टायमिंग बघितले, तर राणे यांना चीतपट करण्यासाठी भाजपनेच पुढे केलेली ही नवीन चाल तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते.
बुद्धिबळाच्या खेळात हत्तीची चाल सुज्ञ आणि सूचक मानली जाते. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे याच चालीने आपली रणनीती ठरवणारे कोकणातील आणखी एक प्रभावी नेते आहेत; पण अलीकडेच त्यांनी ‘काहींच्या राजकारणात तळ्यात-मळ्यात दोन्हीकडे मासा आपल्या जाळ्यात असावा, अशी नीती दिसते,’ असे विधान केले. त्याआधीपासूनच भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे कोकणात आणि प्रसंगी विधानसभेत असलेला एकमेव आक्रमक चेहरा सोडून जाणार या चर्चांना उधाण आले. याला कारणही तसेच ठरले आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद मिळेल या आशेवर भास्कर जाधव होते; परंतु सत्ताधारी पक्षाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव द्या, तत्काळ नावाची घोषणा करतो, असा फासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे टाकला; पण भास्कर जाधवच विरोधी पक्षनेते होतील, या भूमिकेवर ठाकरे ठाम राहिले असले तरी जाधवांच्या मनात अस्वस्थता आहे.वास्तविक, १९९९मध्ये उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथून भास्कर जाधव यांचे तिकीट कापले होते. तेव्हा ते खूप रडले आणि राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना नगरविकास राज्यमंत्रिपद, जलसंपदा विभागाचे कॅबिनेटपद, प्रदेशाध्यक्षपद दिले; पण ते परत स्वगृही म्हणजे शिवसेनेत गेले. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतरही त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. उलट आक्रमकपणे बाजू मांडली. कधी खंबीरपणे उभे राहिले; पण शेवटी कोकणी माणूस. राग किंवा मनातील सल लपवता येत नाही. त्यातूनच त्यांची चाल तळ्यात-मळ्यात होत असल्याची चर्चा आहे. कोकणातील खेळ अंतिम टप्प्यात नाही; पण रणनीती स्पष्ट आहे. भाजप राणेंचा वापर केवळ केंद्रासाठी करणार असून, कोकणात नव्या नेतृत्वावर भर देणार असे दिसते. शिवसेना शिंदे गट आक्रमकपणे भाजपमध्ये ‘स्थानिक निर्णय नियंत्रण’ घ्यायचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे ठाकरे गट जनाधार टिकवून आहे; पण संघटनात्मक स्पष्टता नसल्याने स्थानिक नेत्यांची अवस्था गोंधळलेली आहे.
प्रश्न 1: रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड का झाली?
कोकणात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि नारायण राणे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी.
प्रश्न 2: भाजपसाठी कोकण क्षेत्र का महत्त्वाचे आहे?
मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी कोकणातील वर्चस्व गरजेचे आहे, हे भाजपला समजले आहे.
प्रश्न 3: नारायण राणे यांच्याविरोधात भाजपमध्ये नाराजी का आहे?
त्यांचा प्रभाव कमी झाला असून, त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे वादग्रस्त विधान पक्षाला अडचणीत आणतात.
प्रश्न 4: शिवसेनेतील स्थानिक नेते या घडामोडींवर काय प्रतिक्रिया देत आहेत?
शिंदे गट आक्रमक रणनीती राबवत आहे, तर ठाकरे गटात गोंधळ आणि अस्वस्थता दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.