Kalyan-Dombiwli News : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपाच्या वतीने मानपाडा पोलीस ठाण्यावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करा, अशी मागणी केली होती. यानंतर पोलीस ठाण्यात सूत्र हलली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांना शुक्रवारपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर एका महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी कोणतीही सखोल चौकशी न करता पोलिसांनी हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षातील नेत्यांना लक्ष करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शेखर बागडे यांची सत्ताधारी पक्षातील एका सर्वोच्च नेत्याशी जवळीक असल्याची चर्चा कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण या परिसरात आहे. मुंब्रा येथून पोलीस स्टेशन मध्ये बदली होऊन आल्यानंतर बागडे यांनी आपला चांगलाच दबदबा निर्माण केला. मात्र, एकाच पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ते जुमानत असल्याने भाजपा व मनसे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती.
भाजपाचे डोंबिवली तील वरिष्ठ नेते यांनाही बागडे यांनी नाराज केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच गुन्हा दाखल होताच भाजपाने आंदोलन करत बागडे यांची कोंडी केली. आणि त्यामुळे शुक्रवार पासून बागडे यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. याचे पुष्टीकरण अद्याप मिळालेले नसले तरी याविषयी चर्चा मात्र सुरु आहे.
असे असले तरी शेखर बागडे आपले काम चोख करत असतात. मानपाडा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत कोणताही गुन्हा घडल्यास त्याची ते त्वरित दखल घेतात. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी निवासी भागातील एका मुलाचे अपहरण झाले होते. या मुलाचा शोध घेत त्याची सुखरूप सुटका करण्यात बागडे यांचा मोठा वाटा होता. आरोपी करणारी महिला भाजपाची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. जोशी यांच्या मित्राची ती बायको आहे. नवरा आणि बायको यांच्यात वाद आहेत. जोशी हा महिलेला खोली करण्यासाठी धमकी तसेच शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप महिलेने जोंशी यांच्यावर केला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.