मुंबई : राज्यातील आमदारांना मुंबईत घरं देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ग्रामीण भागातील आमदारांना घरे देण्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली होती. या घोषणेनंतर सर्वच पक्षांतील अनेक आमदारांनी टीका सुरू केली. हा वाद अजूनही सुरूच असून आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेस आमदारांमध्ये जुंपली आहे.
काँग्रेसचे (Congress) आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आव्हांड मुख्यमंत्र्यांनाही टॅग केलं आहे. सिद्दीकी यांनी म्हटलं आहे की, माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील हजारो लोक बेघर असताना मला महाराष्ट्र सरकारकडून कुठल्याही घराची गरज नाही. ते अत्यंत दयनीय अवस्थेत राहत आहेत. मुख्यमंत्री व जितेंद्र आव्हाड यांनी विनंती आहे की त्यांनी हे पैसे आमदारांच्या घरांऐवजी या लोकांच्या घरांसाठी द्यावेत, असं म्हणत सिद्दीकींनी घऱ नाकारलं.
सिद्दीकी यांच्या या ट्विटनंतर आव्हाड यांनीही त्याला उत्तर दिलं. ते म्हणाले, 'तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची दहा घरे आहेत. ही योजना फक्त ग्रामीण महाराष्ट्रातील (Maharashtra) आमदारांसाठी आहे. मुंबईसाठी नाही. तुम्हाला चांगली समज आहे असं मला वाटतं. कुणालाही मोफत घर मिळणार नाही. आशा आहे आता तुम्हाला समजेल.' त्यावर सिद्दीकी यांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. माझ्या मतदारसंघातील एसआएच्या समस्यांबाबत अधिवेशनात तुम्ही मागील काही दिवसांपासून उत्तर दिलेले नाही. आता ट्विटरवर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. कोट्यवधी रुपयांच्या घरांचं म्हणाल तर संपूर्ण देशाला तुमच्याबाबत माहिती आहे, असा टोला सिद्दीकी यांनी लगावला आहे.
एवढ्यावरच न थांबता सिद्दीकी यांनी आणखी एक ट्विट केले आहे. घरांसाठी कोण पात्र आहे किंवा नाही, हे महत्वाचे नाही. सर्वसामान्य जनता बेघर असताना महाराष्ट्रातील कोणत्याही आमदाराला असा लाभ देऊ नये. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण निवडून आलो आहोत. आपल्यासाठी घरं घेण्यासाठी नाही. कोणताही आमदार घर स्वीकारणार नाही, असं सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
आव्हाडांचं स्पष्टीकरण
आमदारांना घरं देण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आव्हाड यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिलं आहे. ''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,'' असे स्पष्टीकरण आव्हाडांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.