Mumbai News : महाराष्ट्र विधानसभेच्या रिक्त विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड करायची यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल दिल्लीला गेले होते. एका दिवसात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून नवा विरोधी पक्षनेता कोण हे नाव फायनल करून आणले. त्यावर विदर्भातील अनुभवी आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची नेमणूक झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा उद्या म्हणजे बुधवारी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात होईल.
नवीन विरोधी पक्षनेत्याचे नाव बुधवारी जाहीर होईल,असे वृत्त कालच सरकारनामाने दिले होते. ते खरे झाले आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्रातील आमदाराऐवजी विदर्भातील आमदाराची या पदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीतून काँग्रेसने ओबीसी कार्डाची खेळी केली आहे. त्यातून विदर्भावर त्यांची खप्पा मर्जी दिसून आली. कारण प्रदेशाध्यक्ष पटोले हे ही विदर्भातील आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने ते पद सध्या रिक्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर त्यांचा गट राज्यातील सत्तेत सामील झाला. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाकावर काँग्रेसचे आमदार सर्वाधिक झाले. त्यातून त्यांचा विरोधी पक्षनेता झाला. ते नाव फायनल करण्यासाठीच पटोले हे काल दिल्लीला गेले होते. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वडेट्टीवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.