Sanjay Raut : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा होत असलेला अपमान आणि भाजपने घेतलेली भूमिका यावर भाष्य केलं आहे. (sanjay raut latest news)
"सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. तसे नसते तर महाराष्ट्राच्या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यास भाजपचे नेते व त्यांचे राज्यपाल धजावले नसते. या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते," असे अग्रलेखात म्हटलं आहे.
वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोळागोळा होऊन पडला..
"छत्रपती शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे," अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
त्यांच्या लोकांना काय सांगायचे आहे?
"शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केला नाही, याआधी तो वारंवार केला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा. जे राज्य चारशे वर्षांनंतरही शिवाजी राजांच्या विचाराने चालले ते कालबाहय़ ठरवून भाजप व त्यांच्या लोकांना काय सांगायचे आहे? शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य फक्त लोककल्याणासाठी होते. त्याच लोककल्याणाचा विचार सर्वच राज्यकर्त्यांनी पुढे नेला,"असे अग्रलेखात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.