पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात मोदींशेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनच अजितदादांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (MP Supriya Sule Latest Marathi News)
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यानंतर थेट मोदींनी भाषण केले. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार अजित पवारांच्या कार्यालयातून याबाबत पंतप्रधान कार्यलयाकडे भाषणाबाबत कळवले होते. पण पीएमओमधून भाषणाला परवानगी देण्यात आली नाही, असं सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मी दादांच्या कार्यालयातूनही ही माहिती घेतली आहे. हे अतिशय गंभीर आणि वेदना देणारे आहे. दादा आमचे नेते आहेतच, पण ते आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असताना त्यांना बोलू देणं हा त्यांचा अधिकार आहे. प्रोटोकॉलप्रमाणे दादांनी पुण्याच्या विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागतही केले, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पुण्यात आले. सहा मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुण्यातील मेर्टोचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी देहूमध्ये ते संत तुकारामांच्या चरणी नतमस्तक झाले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर अजित पवारांचे भाषण होईल, असे वाटत होते. ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे त्यांचे भाषण अपेक्षितच होते. पण फडणवीसांचे भाषण झाल्यानंतर निवेदकाने थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले. यावेळी मोदींनीही निवेदकाकडे पाहत अजितदादांच्या दिशेने हात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.