Marathi Morcha : शेकडो मनसैनिकांना नोटिसा; मराठीसाठी पुन्हा मोर्चा, मुंबईतील वातावरण तापलं
MNS workers Mira Bhayandar : मुंबईतील मीरा-भाईंदर इथं मराठी-अमराठीवरून चांगला वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी मराठीचा अपमान केला म्हणून अमराठी व्यापाऱ्याला फटकारलं होतं. त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद करत मोर्चा काढला.
या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी एकीकरण समिती आणि मनसेने मराठीसाठी उद्या (मंगळवारी) मोर्चाचं आयोजन केलं आहे. परंतु पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटिसा बजावून प्रतिबंध केला आहे. त्यामुळे मोर्चासाठी अधिकच वातावरण निर्मिती झाली असून, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार म्हणजे, निघणार, असा इशारा दिला आहे.
मीरा भाईंदरमध्ये उद्या पुन्हा एकदा मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आहे. मराठी एकीकरण समितीकडून तसे बॅनर झळकवण्यात आले आहेत. सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रेमी यांच्यावतीने मीरा-भाईंदर शहरातील मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या मोर्चा यशस्वी होण्यासाठी मनसेने (MNS) जोरदार तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) फक्त मराठीच, राज्य आमचं, भाषाही आमचीच… भाषेला विरोध केला तर संघर्ष हा अटळ, अशा आशयाचे बॅनर मीरा भाईंदरमध्ये झळकलेत. तर महाराष्ट्रात मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा आशयचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
या मोर्चाचा पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस अलर्ट झाले असून, मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना, नोटिसा बजावत प्रतिबंध केला आहे. शेकडो मनसैनिकांना या नोटिसा गेल्या आहेत. मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसांसाठी मीरा-भाईंदरमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इतर मनसे पदाधिकाऱ्यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई तोडण्याचा डाव
मराठी भाषा संरक्षणासाठी ठाकरे बंधूंनी पाच जुलैला मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या मोर्चाच्या इशाराची दखल घेत, भाजप महायुती सरकारला हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द केला. यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठी आवाज विजयी मेळावा घेतला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी हिंदी भाषाच्या सक्तीतून चाचपणी केल्याचा सरकारचा राजकीय डाव होता, असं सांगताना मराठीसाठी किती सतर्क राहायला पाहिजे, याची जाणिव राज ठाकरेंनी या मेळाव्यात करून दिली.
राज ठाकरेंचा मनसैनिकांना मंत्र
विजयी मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, "मी अजून काहीच केलेले नाही. मुंबईतील अमराठी लोकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे यात काहीच वाद नाही. परंतु, विनाकारण उठसूट कोणालाही मारामारी करायची गरज नाही. कोणी जास्त नाटकं केली, तर त्याच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. मात्र, चूक त्यांची असली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही जे काही कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. त्यांच्या त्यांच्यातच सगळं काही कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही की ‘मी मारलं म्हणून’. मार खाणारा सांगतो, ‘मला मारलं, मला मारलं’, त्यांचं त्यांना सांगू देत, याचा अर्थ असा नाही की उठसूट कोणालाही मारायचं. त्यांना मराठी आली पाहिजे, मात्र कोणालाही उठसूट मारण्याचं कारण नाही.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.