Congress And MVA : महाविकास आघाडीत जागावाटपवरून रस्सीखेच सुरू आहे. ताब्यात असलेल्या जागांच्या संख्येनुसार वाटप जागांच्या वाटपाचा विचार केला जाईल, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी 'मोठा भाऊ कोण' यावरून चांगलीच चर्चा झडली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता काँग्रेसकडूनही पक्षाच्या ताकदीचा आढावा घेणे सुरू आहे.
काँग्रेसच्या वतीने दोन दिवसात ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढवा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या शुक्रवारच्या (ता. २) सभेत काँग्रेस (Congress) नेत्यांनी जागावाटपाबाबत ठोस निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. त्यानुसारच महाविकास आघाडीत जागा वाटप होईल, असेही काँग्रेसनेते सांगत आहेत. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेस कमकुवत आहे, त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्धारही यावेळी बैठकीतून व्यक्त करण्यात आला आहे.
या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपात २०१९ चे निकाल हा आधार होऊ शकत नाही. तसे निकषदेखील नाहीत, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणजे पाच वर्षानंतर संबंधित पक्षाची परिस्थिती तशीच राहत नाही. त्यामुळे पक्षसंघटन आणि स्थानिक परिस्थिती पाहूनच जागावाटप व्हावे, असा सूर या काँग्रेस नेत्यांनी एकमताने आळवला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही २०१९ चे निकाल हा जागावाटपाचा निकष होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहे. पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्त्वाचे आहे. २०१९ ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे. एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम राहत नसते."
यावेळी चव्हाण यांनी एकत्र लढून भाजपचा (BJP) पराभव करू, असाही दावा केला. ते म्हणाले, "कुठल्याही पक्षाची स्थिती बदलत असते. त्यामुळे जागावाटपाबाबत सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला जाईल. तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपचा पराभव करणे कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपला पराभूत करू."
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बैठकांनतर महाविकास आघाडीची रणनिती निश्चित केली जाणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले "काँग्रेसची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य आहे. या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल."
पटोले यांनी देशात भाजपविरोधात नाराजी असल्याचा दावा केला. ते म्हणाले, "देशभर काँग्रेस हाच पर्याय आहे. भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल, याची व्यूहरचना या बैठकीत ठरविली जाणार आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.