मलिकांनी आता थेट फडणवीसांना ओढलं! नीरज गुंडे अन् वानखेडेंचे संबंध

क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे.
Devendra Fadnavis and Nawab Malik
Devendra Fadnavis and Nawab Malik

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drug Case) आता राज्यातील राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरूध्द भाजप (BJP) असं वळण या प्रकरणाला लागलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी (Nawab Malik) भाजपच्या नेत्यांची विस्फोटक माहिती उघड करण्याचा इशारा दिला आहे. तर भाजप नेत्यांनीही मलिकांच्या कुटुंबीयांच्या घोटाळ्याची माहिती तपास यंत्रणा देणार असल्याचे म्हटले आहे. आता मलिकांनी नीरज गुंडे (Niraj Gunde) या व्यक्तीचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या प्रकरणात थेट ओढले आहे.

मलिक यांनी नीरज गुंडे या व्यक्तीचे नाव घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मलिक यांनी माध्यमांशी बोलताना थेट फडणवीस यांचे नाव घेतले नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा रोख फडणवीसांकडेच होता. नीरज गुंडे हा मागच्या भाजप सरकारचा दलाल होता. सर्व शासकीय कार्यालयात त्याचा मुक्त वावर असे. समीर वानखेडे यांच्याशीही त्याचे संबंध आहेत. ईडीच्या कार्यालयातही तो तासन् तास बसतो. माजी मुख्यमंत्री नीरज गुंडेच्या चेंबूर येथील घरी जात होते, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

Devendra Fadnavis and Nawab Malik
सोमय्यांचा दिवाळीनंतर धूमधडाका; तीन मंत्री अन् जावयाचे टेन्शन वाढले

नीरज गुंडे तिथे का जातो, कुणासाठी जातो. कुणाच्या मनात काय भीती आहे. चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय सुरू आहे, असे अनेक सवाल मलिक यांनी उपस्थित केले आहेत. मला याबाबत माहिती मिळत आहे. आतील अधिकारी सांगत आहेत, असंही मलिक यांनी सांगितले. नीरज गुडें यांनी मलिक यांच्या मुलाविषयी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी फराझ नवाब मलिक यांची चौकशी करण्याची मागणी ईडीकडे केली आहे. सीबीआयकडून दिल्लीत एका प्रकरणात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणातील फराझच्या सहभागाबाबत चौकशी करावी, असं नीरज गुंडे यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis and Nawab Malik
मलिकांनी सांगितलं, वानखेडे अन् शबाना कुरेशी यांचा घटस्फोट का झाला?

नीरज गुंडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही काही ट्विट करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलविषयीची दोन व्हिडीओ क्लिप एनसीबीला पाठविल्याचे म्हटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविषयी तसेच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांच्या मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडी, काही शासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीविषयीची ट्विटही गुंडे यांनी टाकली आहेत.

दरम्यान, मलिक यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या नेत्यांविषयी विस्फोटक माहिती उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. मी पोकळ धमक्यांना घाबरत नाही. ते आता घाबरले आहेत. जे आरोप लावत होते तेच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com