Mumbai News: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. सुटका झाल्यानंतर ते अजित पवारांसोबत जाणार की शरद पवारांसोबत राहणार, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. मलिक हे आठवडाभरात याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट झाले. जामीन मिळाल्यानंतर आता नवाब मलिक कोणत्या गटात राहणे पसंत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मलिक यांच्यावरील आरोपांचे स्वरुप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात आले तर भाजप आणि शिंदे गट कोणती भूमिका घेणार हे पाहणेही मोठे रंजक ठरणार आहे.
शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. पण बदलेल्या राजकीय स्थितीत ते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेत्यांसारखी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची पाठराखण करण्याचा वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यावरील आरोपांचे गंभीर स्वरुप पाहता ते सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवू शकतात, असेही बोलले जात आहे.
अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मलिकांची कन्या सना मलिक यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मलिक यांना लवकरच जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला. यामुळे पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण मलिक आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत ही केवळ एक अटकळ ठरणार आहे.नवाब मलिक यांच्याशी दोन्ही गटातील नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही गटाकडून त्यांना विचारणा करण्यात आली आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.