मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (NCB) कामकाजावर आक्षेप घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील हे पथक खंडणीच्या कामात अडकल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच, अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करतेवेळी भाजपशी (BJP) संबंधित दोन व्यक्ती उपस्थित होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. यावर एनसीबीने अखेर मोठा खुलासा केला आहे.
मलिक यांनी आरोप केल्यानंतर एनसीबीचे महासंचालक ग्यानेश्वरसिंह आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मलिक यांनी भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप केलेले दोघे या प्रकरणात पंच आहेत, अशी कबुली एनसीबीने दिली आहे. ते म्हणाले की, आमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. सर्व आरोप हे पूर्वग्रहदूषित आहेत. या प्रकरणात 10 पंच होते. या प्रकरणातील आरोपी आणि आरोप करणारे हे न्यायालयात जाण्यास जाऊ शकतात. आम्ही योग्य प्रक्रियेचे पालन केले असून, याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ.
या प्रकरणात एनसीबीने प्रभाकर साईल, किरण गोसावी (के पी गोसावी), मनीष भानुशाली, औब्रे गोमेझ, आदिल उस्मानी, व्ही. वैगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुझमिल इब्राहिम हे दहा जण पंच होते. यातील गोसावी आणि भानुशाली हे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. भानुशाली याचे भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटोही मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे दाखवले होते.
मलिक यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एनसीबीवर आरोप केले. एनसीबीने आतापर्यंत आपल्या कामाचा दर्जा राखला होता. मात्र, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई आणि बॉलीवूडला बदनाम करण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून धमकावण्यात आले. तसेच, खंडणी मागण्याचे काम सुरू झाले. येथील विभागीय अधिकारी यांनी सोईने पत्रकारांना बातम्या पुरवतात.
आर्यन खान याच्यावर कारवाई करताना जे अधिकारी म्हणून सोबत होते ते भाजपचे कार्यकर्ते होते. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे दोघे एनसीबीशी संबंध नाहीत. तरी ते आर्यन खानला घेऊन कार्यालयात जाताना दिसत आहेत. या दोन व्यक्तींसदर्भात एनसीबीने खुलासा करावा. आर्यन खान याच्यावर कारवाई होण्याच्या काही दिवस आधी भानुशाली हा गुजरातमध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा भाजप नेत्यांसोबत भानुशालीचे फोटो आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.