Ajit Pawar : राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले.
अजित पवार यांनी कुणाचेही नाव न घेता उपस्थित नेत्यांना खडेबोल सुनावले. शरद पवारांसमोर अजितदादांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची खरडपट्टी काढली. शरद पवार यांचा सोमवारी १२ डिसेंबरला वाढदिवस साजरा करण्यात आला.
'तुम्ही इतकं सुंदर भाषण, सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही,'असे विधान अजितदादांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानाचा अर्थ आता उपस्थित नेते, व राजकीय विश्लेषक काढत आहेत.
जयंत पाटलांच्या सांगलीत आठपैकी तीन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यामुळे अजितदादांच्या निशाण्यावर जयंतराव असल्याची चर्चा रंगली आहे. अजितदादांनी केलेल्या या विधानामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी बड्या नेत्यांना सध्या परिस्थितीशी जाणीव करुन देतांना काही नेत्यांचे त्यांनी कौतुक केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला असल्याचे बोललं जाते.
"मी बोललोय...याला अपवाद फक्त नाशिक आणि बीड जिल्हा आहे आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पुणे जिल्हा आहे. तुम्ही इतकं सुंदर भाषण...सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कुणाची बिनपाण्याने करायची असं ठरवलं नव्हतं, पण खरं ते बोललं पाहिजे," अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलं.
राज्यात सत्तातर झाल्यावर विरोधीपक्ष नेतेपदी राष्ट्रवादीत अजित पवार यांच्यानावासह , छगन भूजबळ, जयंत पाटील यांचे नाव होते. यात अजितदादांनी बाजी मारली. गेल्या सोमवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या भाषणानंतर त्यांचे आणि जयंतराव पाटील यांच्यातील धुसफूस चव्हाट्यावर जरी आली नसली, तरी अजितदादांनी वात पेटवल्याची चर्चा आहे. याला आता हे नेते काय उत्तर देतात, की कामाला लागतात, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.