Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन महिला नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. त्यावरून पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्या. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तंबी दिली आहे.
रुपाली पाटील यांनी उघडपणे चाकणकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करून पक्षाच्या नेत्यांवरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पाटील यांनी मीडियाशी बोलतानाही याबाबत ठाम असल्याचे म्हटले आहे.
उमेदवारीवरून दोन महिल्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मध्यस्थी करावी लागली आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही, असे सांगत त्यांनी एकप्रकारे चाकणकरांची उमेदवारी निश्चित नसल्याचे सूचक संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज व निवेदने दिलेली आहेत. अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात. याबाबत, अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाकडे देऊ नये, अशी तंबीही तटकरेंनी दिली आहे.
रुपाली पाटील यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ यावर जोर देताना म्हटले आहे की, या न्यायानुसार आमचे अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. एकाच महिलेला किती पदे देणार?, असा सवाल करत त्या म्हणाल्या, काल पासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही, असे सांगितले.
पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत, त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.