NCP MLA Disqualification :
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. या प्रकरणाच्या सुनावीत दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. आम्हीच मूळ पक्ष, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. मात्र, निर्णय देण्याआधी पक्ष कुणाचा हे ठरवणे गरजेचे असल्याचे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणात 10 व्या सूचीनुसार कारवाई होऊ शकते का? हे ठरवणे गरजेचे आहे. तसेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शन, विधानसभा सचिवालयातील कागदपत्रे, विधानसभा अध्यक्षांसमोरील पुराव्यांचाही विचार या प्रकरणातही लक्षात घेण्यात आले. पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी पक्षाची घटना, पक्षातील नेतृत्व रचना आणि विधिमंडळ पक्षातील बहुमत हे प्रमुख निकष असल्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
30 जून 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याविरोधात निवडणूक आयोगासमोरही सुनावणी झाली. तसेच या प्रकरणात नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना विचारात घेतली, तर राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती सर्वात महत्त्वाची आहे. तसेच महत्त्वाचे राजकीय निर्णय हे अध्यक्ष घेतील, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. यामुळे कार्यकारिणी आणि अध्यक्षांचे अधिकार विचारात घेतल्याचे ते म्हणाले.
29 जूनपर्यंत शरद पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले नव्हते, पण 30 जूनला दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. अध्यक्षपदाची निवड ही घटनेला धरून नाही, असा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला. शरद पवार गटाकडून आमचं बहुमत असल्याचा दावा करण्यात आला. आपला अध्यक्ष कसा योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून पुरावे सादर करण्यात आले. दोन्ही गटांकडून समांतर पुरावे सादर करण्यात आले. यामुळे पक्षाचा खरा अध्यक्ष कोण, हे मी ठरवू शकत नाही, असे निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदवले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी कार्यकारिणीत 28 सदस्य आहेत, तर पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारिणीत अधिकाधिक 25 सदस्य असतील, अशी नोंद आहे. दाव्यानुसार 16 कायमस्वरूपी सदस्य आहेत, तर घटनेत कायमस्वरूपी सदस्य अशी कुठलीही नोंद नाही. राज्याच्या समित्यांनी निवडून दिलेले सर्वाधिक सदस्य आमच्या बाजूने आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीत आम्हाला बहुमत आहे, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे, पण प्रतिनिधींच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाने सादर केले नाहीत. यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीतील बहुमताचा शरद पवार गटाचा दावा मान्य करता येणार नाही. यामुळे पक्षाची घटना आणि नेतृत्व रचना विचारात घेऊन निर्णय घेता येणार नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळ पक्षात बहुमत कोणाचे?
नेतृत्व रचना आणि संघटनात्मक रचना यांची पूर्ण तपासणी केल्यानंतर कुठला गट हा खरा पक्ष आहे, हे ठरवता येत नाही. यामुळे विधिमंडळ पक्षात कुणाचे बहुमत, हा एकमेव निकष शक्य आहे. विधिमंडळ पक्षात अजित पवार गटाकडे बहुमत आहे. अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे, असे म्हणत राहुल नार्वेकर यांनी शरद गटाचा दावा फेटाळून लावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.