Jitendra awhad on NCP MLA Disqualification : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार ( Ajit Pawar) गटाला बहाल केले. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकरणाचा निकाल दिला आहे. निकालात अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले आहेत. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांना थेट धृतराष्ट्राची उपमा देत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेसंबंधी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर आज नार्वेकर यांनी आपला निकाल दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचीच असून, अजित पवार गटातील सर्व आमदार हे पात्र असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्षाच्या निकालानेही शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी हा निकाल हास्यास्पद असल्याची टीका करत संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आव्हाड म्हणाले, कायद्याची पायमल्ली कशी करायची याची शिकवण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घ्यावी, तसेच नार्वेकरांनी अध्यक्ष निवडीसंदर्भात 30 जून 2023 चा उल्लेख केला. मात्र, या तारखेला झालेले अजित पवारांचे अध्यक्ष पद हे नियमबाह्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्यानंतर 1 जुलैला अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून समृद्धी पुलाच्या दुर्घटनेनंतर सरकारवर टीका केली होती. तसेच 3 जुलैला पत्रकारांनी तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण म्हणून विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी शरद पवार असल्याचे सांगितले होते, मग स्वत: अजित पवार यांनी स्पष्ट करूनसुद्धा तुम्हाला काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय? असा सवाल करत राहुल नार्वेकरांवर (Rahul Narvekar) निशाणा साधला. तसेच असे धृतराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील स्वत:च्या राजकीय स्वार्थाकरिता पक्ष फोडायचे, तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही, असे सांगणे हास्यास्पद असल्याची टीका आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांवर केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निकाल दिला. तसेच अजित पवार गटाकडील 41 आमदार पात्र ठरवले आहेत. याच बरोबर नार्वेकरांनी शरद पवार गटाचेही आमदार पात्र ठरवले आहेत. यावर आव्हाड यांनी आम्ही अपात्र ठरलो नसलो तरीही निकालाचे झालेल्या वाचनावरून विधानसभा अध्यक्षकांकडून कायद्याची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे. आजचा निकाल हा हास्यास्पद असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.