

Satara, 10 July : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या वादावरून महायुतीमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. तो वाद राज्यभर गाजला हेाता. त्यावरूनच आज पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांना विरोधकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनीही आम्ही भाऊ-भाऊ म्हणत सडेतोड उत्तर दिले.
पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत असतानाच सातारचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे चिठ्ठी घेऊन त्यांच्याजवळ गेले आणि विरोधकांनी मोका साधला.
चिठ्ठी घेऊन आलेल्या शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘काही हरकत नाही, करुन टाका,’ असे त्यावर स्पष्टपणे सांगितले. मात्र विरोधी बाकीवरील सदस्य गप्प बसतील ते विरोधक कसले. त्यांनी ‘सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा विषय’ असे सांगून मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. काहींनी फडणवीस यांना ‘ते साताऱ्याचे काही बोलणार नाहीत,’ असाही टोमणा मारला.
विरोधकांच्या शेरेबाजीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सडेतोड उत्तर दिले. साताऱ्यात सगळं काही आलबेल आहे, तुमच्या मनाप्रमाणे काहीही घडणार नाही, असे दोनदा सांगत ‘आम्ही भाऊ-भाऊ एकत्रित आहोत,’ असेही ठणकावून सांगितले.
‘ज्यांना मारलं त्यावर ते काय बोलणार,’ असाही मुद्दा विरोधी बाकावरून मांडण्यात आला. त्यालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कोणी कोणाला मारलेलं नाही,’ असे सांगून वादावर पडदा टाकत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.