Mumbai News, 13 July : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही. अर्थात त्यामुळे त्यांच्यावर पक्षाचे वरिष्ठ नाराज आहेत. लोकसभा नाही विधानसभेला तरी राज्यात वर्चस्व राखण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
शनिवारी (13 जुलै) रोजी संध्याकाळी 5 वाजता मोदींच्या (Narendra Modi) हस्ते या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. मात्र, हे केवळ निमित्त असून भाजपला काहीही करुन राज्यात आपली सत्ता आणायची आहे. याचसाठीच मोदींना मुंबईत बोलावलं असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत (Mumbai) येत आहेत. त्यामुळे लोकसभेला नाही निदान विधानसभेला तरी मोदी करिष्मा चालणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोदींच्या हस्ते शनिवारी (13 जुलै) रोजी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता, तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतलं आहे. हा प्रकल्प 4 टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. यासह मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते. ते केंद्र नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन देखील आज केले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 वरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे.
हा जुळा बोगदा जमिनीखाली 20 ते 160 खोल भागात असेल प्रत्येकी 300 मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. सुमारे 14.2 मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (TBM) होणार बोगद्याचे खोदकाम केले जाणार आहे. बोगद्यामध्ये अत्याधुनिक वीजव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे.
तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार आहे. प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही. या प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार आहे. अशा या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन करुन भाजप (BJP) विधानसभेच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.