Milind Narvekar News : ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या नार्वेकरांनी दाखवून दिले, आपण कच्च्या गुरूचे चेले नाहीत...

Vidhan Parishad Election 2024 Results : अनेक चढ-उतार पाहिलेल्या नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडली नाही. नार्वेकर शिंदे गटात जाणार, अशा चर्चा अलिकडेपर्यंत सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना बाजूला केले आहे, अशाही चर्चा मध्यंतरी झाल्या होत्या.
Milind Narwekar - Uddhav Thackeray
Milind Narwekar - Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Milind Narwekar News : पुरेसे संख्याबळ नसतानाही विधान परिषदेची निवडणूक जिंकत आपण कच्च्या गुरूचे चेले नाहीत, हे शिवसेनेचे (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांनी सिद्ध करून दाखवले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांसोबत नार्वेकर यांचे चांगले संबंध आहेत. मतदानाच्या दिवशीच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना नार्वेकर यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, अशा आशयाचे विधान केले होते. निवडणुकीच्या निकालाने ते खरे ठरवले आहे.

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असलेल्या मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची ओळख कट्टर शिवसैनिक अशीही आहे. मुंबईच्या मालाडमधील लिबर्टी गार्डन परिसरात त्यांनी शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून काम सुरू केले. त्यानंतर ते 'मातोश्री'च्या अत्यंत जवळ गेले. त्यांनी लढवलेली ही पहिलीच निवडणूक. 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली होती. एक उमेदवार विजयी होईल, इतकी मते तर नार्वेकर यांच्या पक्षाकडेही नव्हती. काँग्रेसच्या मतांवर त्यांचे भवितव्य अवलंबून होते. सर्वच पक्षांत मित्र असल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी मिलिंद नार्वेकरही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार, अशा अफवा पसरल्या होत्या. मी उद्धव ठाकरेंचा आनंद दिघे आहे, असे म्हणणाऱ्या नार्वेकर यांनी त्या अफवाच असल्याचे सिद्ध केले. त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही.

ठाकरे गटात असले तरी शिंदे यांनाही ते भेटत राहिले. मात्र, ते शिंदे यांच्या जाळ्यात अडकले नाहीत. नार्वेकर शिंदे गटात जाणार, अशा अफवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही पसरल्या होत्या. या अफवा खोडून काढण्यासाठी नार्वेकर कधीही माध्यमांसमोर आले नाहीत. त्यांनी अशा बातम्यांना फारसे महत्व दिले नाही.

मिलिंद नार्वेकर आता आमदार झाले आहेत. यासोबतच ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक, शिवसेनेचे सरचिटणीसही आहेत. एक साधा शिवसैनिक ते उद्धव ठाकरे यांचे पीए, असा नार्वेकर यांचा प्रवास रंजक आहे. हा साधा शिवसैनिक, म्हणजे नार्वेकर 1992 मध्ये पहिल्यांदा मातोश्रीवर पोहोचले ते विभागप्रमुखपद मिळावे म्हणून. ते ज्या भागात (लिबर्टी गार्डन, मालाड, मुंबई) गटप्रमुख म्हणून काम करत होते, त्या वॉर्डाचे विभाजन झाले होते. त्यामुळे आपल्याला विभागप्रमुखपद मिळेल, अशी आशा त्यांना होती. त्यांच्या कामाच्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेतले. वर्षभर त्यांनी मातोश्रीवर हाताला लागेल ते काम केले. 1993 मध्ये ते उद्धव ठाकरे यांचे पीए बनले.

पुढे 2002 पर्यंत शिवसेना नेते, कार्यकर्ते, अन्य पक्षांतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठींचे नियोजन नार्वेकरच करायचे. 2002 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. उद्धव ठाकरे यांची वेळ देणे, त्यांचे दौरे आखणे याची जबाबदारी नार्वेकर यांच्यावर आली. ठाकरेंनी त्यांना कामाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. ठाकरेंचे शिवसेनेतील स्थान वाढत गेले तसे नार्वेकर यांचेही वजन वाढत गेले.

शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्यासमोर एखादी अडचण आली की, ती सोडवण्यासाठी नार्वेकर नेहमी पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांचा नार्वेकर यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.असे सांगितले जाते की, बाळासाहेब ठाकरे यांना नार्वेकर सुरुवातीला आवडत नव्हते, मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळल्यानंतर बाळासाहेबांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला.

Milind Narwekar - Uddhav Thackeray
Jayant Patil Loss : शेकापच्या जयंत पाटलांचे 'वाजले 12'; विधान परिषदेत दारूण पराभव, कुणी केला घात?

नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्यकर्ते, नेते, पत्रकारांना भेटू देत नाहीत, असा आरोप शिवसेनेच्या काही नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर केला होता. पण खरे काय, हे कधी समोर आले नाही. नार्वेकर यांचे मातोश्रीवर वजन वाढले होते. त्यामुळे ते काही नेत्यांना जड वाटू लागले होते. मिलिंद नार्वेकर यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप नाारायण राणे यांनी शिवसेना सोडताना केला होता.

भास्कर जाधव यांनीही शिवसेना सोडताना असा आरोप केला होता, असे सांगितले जाते. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांचाही अप्रत्यक्ष रोख नार्वेकर यांच्याकडेच होता, अशी चर्चा त्यावेळी होती.

असे अनेक चढ-उतार पाहिलेल्या नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडली नाही. नार्वेकर शिंदे गटात जाणार, अशा चर्चा अलीकडेपर्यंत सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना बाजूला केले आहे, अशाही चर्चा मध्यंतरी झाल्या होत्या. त्यावर ठाकरे किंवा नार्वेकर यांनी एकदाही जाहीर वक्तव्य केले नाही.

नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले, तसे त्यांनी अन्य पक्षांतील, अगदी शिंदे गटातील नेत्यांशीही सौर्हादाचे संबंध ठेवले. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. आपण कच्च्या गुरूचे चेले नाहीत, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

Milind Narwekar - Uddhav Thackeray
Vidhan Parishad Vishleshan : विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडी; काँग्रेसची मते ठरली गेमचेंजर, क्रॉस व्होटिंगचा 'मविआ'ला फटका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com