Mumbai News: गेल्या काही महिन्यांपासून राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 20 तारखेला मतदान आणि 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याचं चित्रही स्पष्ट होणार आहे. त्याच निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचारही आता शिगेला पोहचला असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी नेमकं सुजय विखेंनी काँग्रेस का सोडली, भाजपमध्ये का प्रवेश केला, यापाठीमागचं कारण सांगितलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीला ज्यावेळी सुजय विखे यांच्या उमेदवारीचा विषय आला, तेव्हा मी शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती. त्यांच्याशी नगर पश्चिम मतदारसंघाबाबत चर्चाही केली होती. त्यांना छत्रपती संभाजीनगर आणि नगर पश्चिम मतदारसंघांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अदलाबदल करु असं म्हटलं होतं.
तसेही काँग्रेस छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात 12 वेळा हरली आहे, तर नगर पश्चिममधूनही राष्ट्रवादी काँग्रेस तीनदा पराभव पत्करावा लागला होता.त्यामुळे सुजयच्या उमेदवारीसाठी नगर पश्चिम ही जागा काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने सोडावी अन् त्या बदल्यात आम्ही काँग्रेस छत्रपती संभाजीनगरची जागा सोडेल यासाठी प्रयत्न सुरू होते. पण शरद पवार म्हणाले, तेथे कार्यकर्ते ऐकत नाहीत. पण पवारांनी सांगितल्यावर कार्यकर्ते ऐकणार नाही असं कधी होईल का..?असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
विखे पाटील म्हणाले, ज्यावेळी आमचं उमेदवारीसाठी काहीतरी करावं लागेल असं ठरलं. त्यावेळी याविषयी राहुल गांधींना (Rahul Gandhi) भेटायचं ठरलं. त्यावेळी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे हेही तिथे उपस्थित होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, मला आपण संधी दिली.पण आता सुजयसाठी काहीतरी करावं लागेल. त्यावेळी त्यांनी माझ्यासमोरच अहमद पटेलांना फोन लावले.त्यानंतर जागा एनसीपीच्या जागेवर एनसीपी म्हणून जागा सोडायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं.
यानंतर राहुल गांधी म्हणाले, राधाकृष्ण विखेजी तुम्ही एनसीपीच्या तिकीटावर का नाही लढत असं विचारणा केली. यानंतर मी त्यांचे आभार मानले.बाहेर पडलो आणि सुजयला लगेच फोन केला आणि सांगितलं तुझा निर्णय घेऊन टाक.त्याने लगेच देवेंद्र फडणवीसांना फोन करत निर्णय झाला असल्याचं कळवलं, असेही विखेंनी सांगितले.
जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांचं ऐकत नाही, तिथं मी राष्ट्रवादीचं तिकीट घेणं म्हणजे राजकीय आत्महत्याच असल्याचंही ते म्हणाले. कारण एखाद्या पक्षाचा अध्यक्षच जर दुसर्या पक्षाकडून लढायला सांगत असेल, तर मग पक्षात राहायचे कशाला म्हणत राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं असा आरोप राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.त्यामुळे काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता असून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.