Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संविधान बदलाच्या मुद्यावरून भाजपला घेतले होते. त्याचा जोरदार झटका भाजपला बसला. त्यातून धडा घेत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरूवातीपासून काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकदाही उल्लेख न करणे, हाही याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बहुतेक नेते आपल्या प्रत्येक भाषणात भाजपला संविधान बदलायचे आहे, असा आरोप करत होते. भाजपमधील काही नेत्यांच्या विधानांचाच त्यासाठी आधार घेतला जात होता. भाजपला संविधान बदलासाठी 400 हून अधिक जागा हव्या असल्याचा नॅरेटिव्ह काँग्रेसने सेट केला. मतदारांनी मतदानातून त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला.
आणखी एक बाबा म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी ‘भटकती आत्मा’ हे शब्द. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी अशा शब्दांचा भडिमारही महायुतीला भोवला. त्यावेळी सहानुभूतीच्या सुप्त लाट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचे महायुतीच्या लक्षातच आले नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मात्र नेमके सगळे याउलट होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आतापर्यंत राज्यात आठ प्रचारसभा (छत्रपती संभाजीनगरच्या सभेपर्यंत) झाल्या. त्यापैकी एकाही सभेत त्यांनी ना शरद पवारांचे नाव घेतले ना उद्धव ठाकरेंचे. केवळ आघाडीवाले, काँग्रेसचे आघाडीतील सहकारी असे शब्द त्यांनी वापरले. विशेष म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करणेही त्यांनी टाळल्याचे दिसते.
दोन्ही नेत्यांची नावे न घेण्यामागे मोदींची निश्चितच काही रणनीती असणार. मागील निवडणुकीत त्यांच्यावर केलेल्या टीकेमुळेही महायुतीला फटका बसला असेल, याचा रिपोर्ट स्थानिक भाजप नेत्यांनी दिला असेल. त्यामुळेच मोदींच्या प्रचारसभांमध्ये पहिल्यांदाच पवार आणि ठाकरेंचा साधा उल्लेखही होताना दिसत नाही. सध्या मोदींचा संपूर्ण रोख ‘एक है तो सेफ है’ हे नॅरेटिव्ह सेट करण्याकडे आहे.
मोदींकडून काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला जात आहे. काँग्रेसकडून जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मोदी सतत सांगत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 पुन्हा लागू करण्याबाबत तेथील विधानसभेत करण्यात आलेल्या ठरावाचा मुद्दा मांडत आहेत. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कसा अपमान केला, आरक्षणाला काँग्रेसचा कसा विरोध होता, या मुद्द्यांवर मोदींचा विशेष जोर देत ते आघाडीविरोधात वातावरणनिर्मिताचा प्रयत्न करत आहेत.
लोकसभेत काँग्रेसने संविधान बदलाचा नॅरेटिव्ह सेट केल्यानंतर भाजप नेते आपल्या भाषणांतून उत्तर देत होते. आंबेडकरही हे संविधान बदलू शकत नाहीत, हे प्रत्येक सभेत मोदी सांगत होते. आता मोदींनी सेट केलेल्या नॅरेटिव्हला काँग्रेसचे नेते उत्तर देत आहेत. राहुल गांधी यांनी गुरूवारी नंदूरबार येथे झालेल्या सभेत संविधान, पुस्तकाचा रंग, यावरून पलटवार केला.
दोन्ही बाजूने जोरकस प्रचार करत एकमेकांना अडचणीत टाकणारे मुद्दे मांडले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धसका घेत भाजपने प्रचाराची दिशा बदलली. त्यामुळे आता पुढील चार दिवसांच्या प्रचारात मतदारांना आपले म्हणणे पटवून देण्यात कोण यशस्वी ठरणार, हे निकालातूनच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.