मुंबई : ''रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत. मी पिडीतेला सर्वतोपरी मदतचं केली तरीही माझ्यावरच खोटे आरोप केले गेले,'' असा दावा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही मागणी मी पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तांना इ-मेल आणि लेखी अर्जाद्वारे केली आहे, असेही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात शिवसेना (Shivsena) नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने नाट्यमय वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले गेले. पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला वाघ यांनीच आपल्याला भाग पाडलं, असा गंभीर आरोप तरुणीने केला असून मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे तरुणीने म्हटले आहे.
संबंधित तरुणीने 'साम टीव्ही'शी बोलताना चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणले, असा पीडितेचा आरोप आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे. त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हंटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरूणीने केला होता.
काय आहे प्रकरण ?
या प्रकरणातील संबंधित पिडीत तरुणीने 17 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कुचिक यांनी आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने माझा गर्भपात केला. असा आरोप तरुणीने कुचिक यांच्यावर केला होता. हा सगळा प्रकार पुण्यातील प्राईड हॉटेल, गोव्यातील बाय द बीच या हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये घडला. अशी माहिती पिडीत तरुणीने पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्या तरुणीसोबत मुंबईत पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने रघुनाथ कुचिक यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.