Raj Thackeray On Toll And Bridge Collapse : मुंबईत दादर येथील सावरकर स्मारकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुंबई, ठाणे कोकणमधील मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत टीका करत सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं.
'प्रत्येक टोल नाक्यावर ९० कॅमेरे लावले आहेत. समजतच नाही. किती गाड्या येताहेत किती जाताहेत? मुंबई आणि ठाणे आरटीओमध्ये रोज हजारो गाड्या रजिस्टर होत आहेत. आणि टोलवर गाड्या तेवढ्याच, असं कसं होईल? सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये. असं राजकारण आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात मी कधी बघितलीच नाही', असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर टीका केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'जगाच्या पाठीवर महाराष्ट्र हे एकच राज्य असेल. एकच पक्ष आहे. त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा सत्तेच्या बाहेर आहे. आणि त्याच नावाने. सत्तेत कोण आहे, शिवसेना अन् विरोधी पक्षात कोण आहे तर शिवसेना. सत्तेत कोण आहे राष्ट्रवादी आणि बाहेर कोण आहे राष्ट्रवादी. अशी परिस्थिती बघितली आहे का जगात कधी? हे काय राज्य म्हणायचं की काय म्हणायचं? नुसतं आपलं चाललंय. दिवस ढकलताहेत', असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांना टोला लगावला आहे.
'कोकणामध्ये काल पूल कोसळला. सगळ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, हे मी आधीच बोललो होतो. कोणाचं लक्ष नाही कशाकडे. तुम्ही जगा मरा, वाटेल ते करा. पण मतदानाच्या दिवशी जिवंत राहा. मतदान करा आणि तिथेच मेला तरी चालेल. काय पूल बांधताहेत. लोकांची चिंताच नाही कोणाला', असं राज ठाकरे म्हणाले.
'किशोर रूपचंदानी याला चिपळूणचा पूल बांधायला दिला होता. १४० कोटी रुपयांचा हा पूल पडला. वृत्तपत्रात बातमी आणि पुढे काहीच झालं नाही. संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले होते, गणपतीदरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका सुरू करतो. आता सगळं वाहून गेलं आणि फुकट गेलं. कोट्यवधी रुपये नुसते फुकट जातहेत. लोकांचा जीव जातोय, पुढे काहीच होत नाही', असं म्हणत राज ठाकरे यांनी निशाणा साधला.
'चिपळूणमध्ये पूल पडला त्या कंत्राटदाराला १४० कोटींचं काम मिळालं. त्यालाच परशुराम ते आरोळी या रस्त्याचं ६७० कोटी रुपयांचं काम दिलं आहे. आणि मुंबईत जवळपास ९८० कोटी रुपयांचं काम त्याचं सुरू आहे. ज्यांच्या हातून पूल पडत आहेत, रस्ते चांगले बांधले जात नाहीत. त्यांच्याकडून नागरिकांना सोयी मिळत नाहीत. अशा लोकांना १००० ते २००० कोटींची कामं दिली जाताहेत. आणि आपण हताशपणे बघत बसलोय. काय चाललंय ते', असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
'माझ्या आतमध्ये ज्या काही गोष्टी धुमसताहेत ना, त्या सगळ्या योग्य वेळी मी बाहेर काढेन. आपल्या इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले ना यांना त्याचे, बघाच तुम्ही', असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.