Shivsena UBT : 'भाजपला 'अखंड महाराष्ट्र' कल्पनाच मान्य नाही, लुटीतला वाटा टाका आणि मुंबईचा लिलाव...;' ठाकरेंच्या युतीनंतर सामनातून हल्लाबोल

Raj and Uddhav Thackeray alliance : 'मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांत आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,' असे दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितले तेव्हा मराठी मनात आणि मनगटात चैतन्य उसळले.
Raj and Uddhav Thackeray alliance
Raj and Uddhav Thackeray allianceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Dec : बहुचर्चित राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी आपल्या राजकीय पक्षांची अधिकृत युतीची घोषणा काल वरळीच्या ‘ब्लू सी’ हॉटेलमधून केली. या युतीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठी माणसांना भावनिक करत आहेत, पण तरीही जनता त्यांना भुलणार नाही, असं म्हणत टीका केली आहे.

दरम्यान विरोधकांची टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. सामनात लिहिलं की, महाराष्ट्राच्या परमपवित्र भगव्या ध्वजाला अभिवादन करून उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा मंगल कलश महाराष्ट्राच्या मस्तकी लावला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आतापर्यंत असंख्य युत्या आणि आघाड्या झाल्या असतील, पण महाराष्ट्रात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालेली युती ऐतिहासिक, क्रांतिकारक आणि मराठी माणसाला बळ देणारी ठरणार आहे.

'मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांत आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,' असे दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितले तेव्हा मराठी मनात आणि मनगटात चैतन्य उसळले. मुंबईत मराठी माणसाची आणि देशाच्या राजकारणात महाराष्ट्राची प्रचंड पीछेहाट होताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा जयजयकार होण्याचे थांबले आहे. मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान मुंबईतील उपऱ्या धनिकांनी व शेठजींनी रचले. ते हाणून पाडण्यासाठी मराठी माणसाला 106 हुतात्मे वेदीवर चढवावे लागले याचे भान नसलेली पिढी आज महाराष्ट्रात तरारली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षात आजचा भाजप कधीच नव्हता. किंबहुना अखंड महाराष्ट्र ही कल्पनाच त्यांना मान्य नाही, अशा शब्दात सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Raj and Uddhav Thackeray alliance
Mumbai–Ahmedabad Bullet Train : ऐन निवडणुकीपूर्वी महापालिकेचा दणका! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनचं काम बंद पाडलं

तर भाजपमधील थैलीबाज पुढाऱ्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय किंवा तिचा शहा-मोदींनी तुकडा पाडला काय, त्याविषयी कोणत्याच तीव्र भावना नाहीत. ‘मुंबईच्या लुटीतला आमचा वाटा आमच्या पदरात टाका व मुंबईचा लिलाव करा’ असा विचार करणारे भाजप व त्यांचे बगलबच्चे आहेत. मुंबईच्या आसपासचा सर्व सुवर्ण परिसर गुजरातच्या व्यापाऱ्यांनी विकत घेतला आहे. पनवेल, ठाणे, पालघर, डहाणू, रायगड, अलिबागपर्यंतच्या मोक्याच्या जमिनी ‘शहां’च्या पिलावळीने ताब्यात घेतल्या आहेत व भाजपवाले या पिलावळींचे पोशिंदे बनले आहेत.

अशा लांडग्यांच्या हाती मुंबई व मराठी माणसाचे भविष्य सुरक्षित नाही. मुंबई गुजरातला जोडण्याचे ‘शहा’ कंपनीचे स्वप्न जुने आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अडसर होता. म्हणून ‘शहा’ कंपनीने मराठी माणसांची अभेद्य संघटना शिवसेना तोडून बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प आणि स्वप्न पायदळी तुडवले. शिंदे-मिंधेंसारखे ‘खोजे’ उभे करून त्यांनी मुंबईवरील मराठी माणसाची मूठ कमजोर केली, असं म्हणत शिंदेसेनेवर टीका केली आहे.

Raj and Uddhav Thackeray alliance
Prashant Jagtap : खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ म्हणणाऱ्या मिटकरींची प्रशांत जगतापांनी लायकीच काढली; म्हणाले, 'तडजोड करणाऱ्या, फुटकळ आमदाराच्या...'

मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहू नये व मराठी संस्कृतीच्या सर्व खुणा पुसल्या जाव्यात यासाठी शहा मंडळींची शर्थ चालली आहे. शहा-मोदींच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, तितकेच भयही आहे. त्याचे कारण असे की, मराठी लोक शूर आहेत, मराठी लोक मुत्सद्दी आहेत, मराठी लोक राजकारणी आहेत. मराठी लोकांनी दिल्लीसह अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी माणूस राष्ट्रभक्त आहे. मराठी माणसाने जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अशा मराठी माणसांचे भय दिल्लीतील ‘शहा’ मंडळींना वाटते. त्यामुळे सत्तेच्या जोरावर मराठी माणसाचे जास्तीत जास्त खच्चीकरण करण्याचे धोरण दिल्लीने स्वीकारले.

भाजप व मिंध्यांचे लोक महाराष्ट्रावरील हे आक्रमण निमूटपणे सहन करीत आहेत. कारण त्यांची अवस्था दिल्लीच्या बुटचाटय़ांसारखी झाली. मिंधे व त्यांचे लोक तर शहांचे हरकामेच बनले आहेत. पैसे लुटण्याचे व त्या लुटीवर निवडणुका लढवण्याचे परमिट शहांनी दिल्यामुळे मराठी माणसावरील हल्ले व महाराष्ट्राची पीछेहाट ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

या महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्यासाठी व मराठी जनांचा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले हा महाराष्ट्रासाठी शुभशकून आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्ही घाबरत नाही, असे भाजप व मिंध्यांचे लोक सांगतात. हीच त्यांच्या पोटातली भीती थोबाडातून बाहेर पडत आहे. महाराष्ट्र आता उसळून प्रतिकार करेल. मराठी माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहील. तो लढेल आणि जिंकेल. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हाच संदेश आहे, असं सामनात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com