राज्यसभा निवडणूक: आमदाराने व्हीप मोडल्यास सदस्यत्व जाणार? त्याच्या मताचे काय होणार?

Rajyasabha Election | Congress | BJP | Shivsena | NCP : ठाकरे सरकारचे टेन्शन वाढवणारे दोन नियम
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात तब्बल २४ वर्षांनंतर राज्यसभा निवडणूक होत आहे. सहा जागांसाठी सात अर्ज आल्यामुळे ही निवडणूक लागली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही उमेदवारांना जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना स्वतःचे प्रत्येक मत महत्वाचे बनले आहे. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनाही कमालीचे महत्व आले आहे. (Rajyasabha Election Latets News)

या निवडणुकीत अपक्ष आणि इतर आमदारांना आपल्या बाजूला करुन घेण्याचा दोन्ही बाजूंचा जोरदार प्रयत्न दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी पक्षाच्या काही आमदारांनीही पक्षादेश अर्थात व्हीप न पाळता क्रॉस व्होटिंग करण्याची भीती वर्तवली जात आहे. शिवाय असे क्रॉस व्होटिंग केल्यास सदस्यांचे सदस्यत्व देखील रद्द होवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत स्पष्ट भाष्य केले.

पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालान्वये पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश न पाळता दुसऱ्या उमेदवाराला मतदान केले तरी त्यांच्या सदस्यत्वाला कोणताही धोका निर्माण होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट २००६ रोजी कुलदिप नय्यर विरुद्द भारत सरकार या खटल्यात म्हटल्याप्रमाणे, कोणाला मत द्यायचे हे प्रत्येक मतदाराचे स्वातंत्र्य आहे. ओपन बॅलेट पद्धतीमध्ये जर या स्वातंत्र्याला बाधा येत असेल तर त्याच्या सदस्यत्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. त्याचे सदस्यत्व रद्द होणार नाही. मात्र पक्ष त्या सदस्यावर कारवाई करु शकतो.

राज्यसभा निवडणुकीचे मतदान ओपन बॅलेट असते. शिवाय सदस्याने मतदान करताना पक्षाने नियुक्त केलेल्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवून मतदान करावे लागते. जर संबंधित उमेदवाराने पक्षाच्या प्रतिनिधीला न दाखवता मतदान केले तर ते मत बाद ठरवले जाते. गुजरातमध्ये २०१७ साली याच नियमाच्या आधारे काँग्रेसच्या एका आमदाराने केलेले मत रात्री १२ वाजता बाद ठरवण्यात आले होते.

तुरुंगातील सदस्यांना मतदान करता येत नाही :

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या नियम क्रमांक ६२ (५) नुसार जे आमदार तुरुंगात शिक्षा भोगत असतील, किंवा त्यांच्याविरोधातील सुनावणी न्यायप्रविष्ट असेल आणि त्यावेळी ते कारागृहात असतील अथवा संबंधित आमदार पोलिस कोठडीत असताना त्यांना कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मात्र न्यायालयाने परवानगी दिल्यास मतदान करता येत असल्याचेही काही घटनांमध्ये दिसून आले आहे.

1. महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ

महाविकास आघाडीकडे सध्या १७० आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ४२*३ = १२६ म्हणजे ३ खासदार सहज निवडून आणू शकते. तर महाविकास आघाडीची शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष १६ असे ४३ आमदार मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.

2. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :

तर विरोधकांचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार भाजप ४२*२ = ८४ म्हणजे २ जागा सहज निवडून आणू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे स्वतःची २२ आणि विरोधकांची ७ मत शिल्लक राहत आहेत. भाजपला तिसऱ्या जागेसाठी १३ मते कमी पडत आहेत.

3. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com