Mumbai Political News : काँग्रेस पक्षाला ट्विट करून रामराम ठोकल्यानंतर मिलिंद देवरांनी, आपण विकासाच्या मार्गाने जातोय, असे म्हटले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी देवरांवर सडकून टीका केली. देवरा कुटुंबांचा राजकारणातील 50 वर्षांचा इतिहासच काढला. त्यानंतर मिलिंद देवरांनी खरं बोलावं. आमदार, खासदारकीसाठी संधी दिसत नसल्याचे सांगावं, असे आवाहनही केले.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'ज्या पक्षात तुम्ही 50 वर्षे खाताय, पिताय, वाढाताय. तुमचे वडील काँग्रेसचे मोठे नेते होते. मग या देशाचा 50 वर्षांत विकास झाला नाही का ? असा थेट प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. आता मिलिंद देवरांनी खरी कारणे सांगावीत. काँग्रेस पक्षात मला आमदार, खासदारकीची संधी दिसत नाही म्हणून मी गेलो,' असे हिमंत दाखवून खरं बोलावे, असे आवाहनही केले.
'शिंदे गट म्हणजे विकासाचा महापुरूष आहे का ? शिंदे गट जन्माला कधी आला, कसला विकास, या गोष्टी कळल्या पाहिजेत. आपण मुरली देवरांचे चिरंजीव आहोत, हे तरी लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही विकासाच्या मार्गाने जातोय म्हणणे म्हणजे, तुमच्या वडिलांनी ज्या पक्षासाठी 50 वर्षे घालवून देशाच्या विकासासाठी योगदान दिले, त्या वडिलांचा आपमान केला,' असे म्हणत राऊतांनी देवरांना डिवचले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवरांच्या नाराजीचं कारण काय?
काँग्रेसमधील मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा (Milind Deora) याचे पक्षात मोठे वजन होते. देवरा कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, मिलिंद देवरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली? याची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. दक्षिण मुंबईच्या जागेवरून राजीनाम्या दिल्याचे कारण सध्यातरी चर्चिले जात आहे. आगामी निवडणुकीत लढण्यासाठी मिलिंद देवरा इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
देवरा पिता-पुत्रांची राजकीय कारकीर्द
काँग्रेसमध्ये वजनदार असलेले मुरली देवरा यांची राजकीय कारकिर्द 1968 पासून सुरू झाली. मुंबई पालिकेत नगरसेवक, महापौर, खासदार, मुंबई काँग्रेसचे 22 वर्षे अध्यक्षपद भूषवले. मात्र, मुरली देवरा यांचा 1996 आणि 1999 मध्ये लोकसभेत पराभव झाला.
त्यानंतर त्यांचा मुलगा मिलिंद देवरांना पहिल्यांदा 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत उतरवले. त्यात त्यांचा विजय झाला. 5 ऑगस्ट 2004 रोजी त्यांना संरक्षण मंत्रालय समितीचे सदस्य करण्यात आले. 7 ऑगस्ट 2006 रोजी ते केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य झाले. 2009 मध्ये ते पुन्हा लोकसभेत पोहचले. मात्र, 2014 आणि 2019 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.