Sanjay Raut : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा (Bal Keshav Thackeray) आज (१७ नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला काल (बुधवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. आज (गुरुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी अकरा वाजता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येणार आहेत. (mp sanjay raut on balasaheb thackeray death anniversary)
शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी टि्वट करुन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. राऊतांनी बाळासाहेब यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत आठवणींना उजाळा दिला आहे.
"हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है..साहेब..विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र," असं टि्वट राऊतांनी केलं आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं.या वरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून जाताच तिकडे लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आले. त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.
यावेळी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते. गद्दारांमुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ हे अपवित्र झाले आणि म्हणून तिथे गोमूत्र शिंपडून आम्ही ते पवित्र केले, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या आणि मग त्यांच्याबद्दल बोला असाही टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
बाळ केशव ठाकरे यांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते पक्षप्रमुख असा प्रवास करणार्या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर आपला करिष्मा तयार केला. यंदा त्यांची दहावी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 दिवशी वृद्धापकाळाने त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.