
Sanjay Shirsat : राज्यात विविध मुद्यांवर सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले आहेत. 2024च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तरही दिलं आहे.
"सत्तेत सहभागी असलेले शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. शिंदे गटातील १० आणि इतर ५ असे मिळून १५ जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटामध्ये याबाबत कुजबूज सुरू आहे. येत्या काळात यासंदर्भातील काही घटना घडणार आहेत. तसंच, येत्या काळात शरद पवारांच्या विचारांचाच विजय होईल ,एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीसत्तेत येण्याची शक्यता आहे".असंही रोहित पवार म्हणाले होते
“शिवसेनेचे १५ आमदार जे शिंदे गटात गेले आहेत ते येत्या काळात उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा प्रयत्न करतील. चर्चा सुरू आहे. फक्त उद्धव ठाकरे त्यांना घेतील की नाही हे पाहावं लागेल”, असं रोहित पवार म्हणाले होते.
रोहित पवारांच्या या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे."रोहित पवारही उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते झाले का असा सवाल करीत रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचं दुसऱ्या पक्षात काय चाललंय ते", अशा शब्दात संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. “रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले म्हणजे आश्चर्य आहे. संजय राऊत होते की प्रवक्ते, आता हे कशाला होतायत? रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचं दुसऱ्या पक्षात काय चाललंय, तुम्ही तुमच्या पक्षात काय सुरु आहे त्याकडे लक्ष घाला, असा सल्ला देत शिरसाट यांनी रोहित पवारांची कानउघाडणी केली.