मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेले टिकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सणसणीत उत्तर दिले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्यावर पवारांनी जातियवादातून टीका केल्याचा आरोप ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना मंगळवारी केला होता.
या वक्तव्यांचा समाचार पवार यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला. ते म्हणाले “बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबतच्या माझ्या विधानाचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले, असे विधान केले होते. याला माझा सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे राजमाता जिजाऊंनी घडवले. त्यामुळे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण मान्य केले पाहिजे. पण पुरंदरेंनी याबाबत वेगळे लिहिण्याचा प्रयत्न केला, तो योग्य नव्हता. हे माझे मत तेव्हाही होते आणि आजही आहे.”
दुसरा गंभीर प्रश्न असा की, जेम्स लेन यांनी जे विकृत लेखन केले होते, त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता, अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे गलिच्छ लिखाण करत असेल व जर ती माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव घेत असेल आणि त्याचा खुलासा पुरंदरे यांनी कधी केला नसेल तर त्याबाबत टीका केली तर दुःख वाटण्याचे कारण नाही. उलट मला याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन पवार यांनी केले.
पवार म्हणाले की, "मी धर्माचे प्रदर्शन करत नाही. मी आजवर १२ ते १४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा. पण त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही. दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत. प्रबोधनकारांचे लिखाण जर तुम्ही वाचले तर यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. प्रबोधनकारांनी देव-धर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रचंड टीका-टिप्पणी केली.
धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम त्यांनी केले. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही लोक वाचतो. पण सगळेच वाचतात असे नाही. बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत, असे दिसते. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.