Devendra Fadnavis, Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात 2019 मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या पाहटेच्या शपथ विधीवरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आमच्यावर डबलगेम केला त्यामुळेच आमचे सरकार येऊ शकले नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर बोलत असताना शरद पवार म्हणाले, जर दोन दिवसांमध्ये मी भूमिका बदलली असेल, तर फडणवीस यांनी दोन दिवसांनी शपथ का घेतली? शपथविधी चोरुन पहाटे घेतला? फडणवीसांना जर खात्री होती की पाठिंबा आहे, तर हे करायची आवश्यकता नव्हती. आमचा पाठिंबा होता म्हणतात तर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार राहिले का? दोन दिवसातच त्यांची सत्ता गेली. याचा स्वच्छ अर्थ हा आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही त्यांची पावले होती. ती पावले समाजासमोर यावीत यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या, असे पवार यांनी स्पष्ट केले.
आम्ही फसवले असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणत आहेत. माझा प्रश्न आहे फसले का? उद्या मी तुम्हाला सांगितले गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला तर लगेच शपथ घ्यायला याल का असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. मोदींचा यात काही संबंध नाही आहे. सत्तेशिवाय ज्यांना करमत नव्हते ते राज्यातले नेते होते. भेट झाली होती, मी याआधीही सांगितले होते. आजही भेटलो होतो, त्याचा अर्थ असा होत नाही की अशाच काही गोष्टी असतात. सत्तेशिवाय त्यांची जी अस्वस्थता होती ती लोकांसमोर आली. आमच्या चर्चा झाल्या. काही करुन त्यांना आमची मदत हवी होती. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय गोष्टी घडतात का? असेही पवार म्हणाले.
मी दोन दिवसात माघार घेतली होती, असे ते म्हणत आहेत तर त्यांनी शपथ का घेतली असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. हा शरद पवारांचा डाव होता, असा अर्थ काढायचा का असे विचारले असता पवार म्हणाले, तुम्हाला जो काही अर्थ काढायचा तो काढा. हा डाव होता की नाही मला माहित नाही आहे.
मात्र, माझे सासरे होते, त्यांचे नाव सदू शिंदे. ते चांगले बॉलर होते. त्यांनी अनेक मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या. मी क्रिकेट खेळलो नव्हतो. मी जागतीक क्रिकेटचा अध्यक्ष होतो, त्यामुळे गुगली कसा टाकायचा कधी टाकायचा मला माहित होते. त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे ना. अजित पवारांना (Ajit Pawar) नामुष्की सहन करावी लागली असे फडणवीस म्हणाले, असतील पण त्यांची विकेट गेली हे सांगतात. फडणवीस आणि भाजपाचे (BJP) लोक सत्तेसाठी किती पुढे जाऊ शकतात हे दाखवून दिले, असे पवार यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.