
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 बंडखोर आमदारांकडे शिवसेनेचे (Shiv Sena) चिन्ह धनुष्यबाण जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बंडखोर आमदारांकडूनही असा दावा केला जात आहे. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इतर चिन्हाबाबत वक्तव्य केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. त्यानंतर ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. (Uddhav Thackeray Latest Marathi News)
मागील काही दिवसांतील घडामोडींनंतर ठाकरे यांनी पहिल्यांदाच मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या चिन्हावर सध्या चर्चा सुरू आहे. कायद्यात जे नमूद केलं आहे, त्यानुसार धनुष्यबाण कोणीही हिरावून घेणार नाही. याची चिंता सोडा, असं शिवसैनिकांना सांगितलं आहे. शिवसेनेच्या उमेदवाराच्या पक्षाचं चिन्ह नव्हे तर त्या उमेदवाराची लक्षणे या अर्थाने सांगितले होते. शिवसेनेपासून कुणीही धनुष्यबाण वेगळं करू शकत नाही. हे कायदेतज्ज्ञांशी बोलून सांगत आहे.
शिवसेना ही एखादी गोष्ट नाही, चोरून न्यावी अशी गोष्ट नाही. रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत असतो. त्यामाध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येतात. कधीकाळी आमचाही एकच आमदार होता. तेच जर गेले असते तर पक्ष संपला असता का. नाही संपू शकत. सगळे आमदार गेले तर पक्ष अस्तित्वात असतो, असं ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधीमंडळ पक्ष आणि पक्ष वेगळा असतो. सगळ्यांनाच पैशाची अमिषे दाखवून नेऊ शकत नाहीत. पदाधिकारी पक्षासोबतच आहेत, असं स्पष्ट करून ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हा पक्ष ठाकरे कुटुंबीयांकडे राहणार असल्याचे सांगितले.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात जात आहेत. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, सध्या महापालिका, नगरपालिका अस्तित्वात नाही. त्यांची लोकं असतील ती गेली असतील. माझ्या निष्ठावंताना खाली बसवून त्यांना उमेदवारी दिली होती. ते गेले, असं ठाकरे म्हणाले.
मला शिवसैनिक रोज भेटत आहे. ज्यांचं तळहातावर पोट आहेत, अशी साधं लोक येऊन रडत आहे. शिवसेनेने आजपर्यंत साध्या-साध्या माणसांना मोठं केले, हा अभिमानाचा विषय आहे. साध्या लोकांच्या मेहनतीने ज्यांना मोठेपण मिळालं, ती गेली. पण मोठ्या मनाची साधं माणसं शिवसेनेसोबत आहेत. तोपर्यंत शिवसेना कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.