दिवा : कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये (Shivsena) जोरदार इनकमिंग चालू झाले आहे, आणि या इनकमिंगचा मोठा आणि थेट धक्का भाजपला बसताना दिसत आहे. दरम्यान आता शिवसेनेने असाच एक धक्का देत अवघ्या १५ दिवसांत दिवा मंडळचे दोन अध्यक्ष फोडले आहेत. काही दिवसांपूर्वी दिवा मंडळ अध्यक्षपदी विराजमान झालेले भाजप (bjp) शहर उपाध्यक्ष निलेश पाटील (Nilesh Patil) यांनी पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसमवेत मंगळवारी दुपारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हा भाजपला दुसरा धक्का आहे. १५ दिवसांपूर्वीच तत्कालीन भाजप दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यापूर्वी आदेश भगत हे शिवसेनेत जाणार असल्याची कुणकुण लागताच एक दिवस आधीच भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांनी निलेश पाटील यांची दिवा मंडळ अध्यक्ष पदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्रही एक छोटा कार्यक्रम घेऊन दिले होते.
मात्र या नियुक्तीला २० दिवस पूर्ण होण्यापूर्वीच निलेश पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनाही शिवसेनेने गळाला लावत भाजपला दुसरा धक्का दिला आहे. मंगळवारी मंत्रालयात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पाटील दाम्पत्य हे दिव्यात भाजपची ताकद आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जायचे. मात्र आता भाजपचे महत्वाचे पदाधिकारीच सेनेत गेल्याने दिव्यातील भाजपची ताकद कमी झाली आहे.
शिवसेनेच्या झटक्याने भाजप-मनसे युतीची चर्चा
दरम्यान, शिवसेनेने चालू केले जोरदार इनकमिंगमुळे भाजप ताकद कमी होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आता मुंबई-ठाण्यात भाजप-मनसे यांनी युती करावी असे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते दबक्या आवाजात म्हणत आहेत. त्यामुळे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप-मनसे युती करतात हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.