Shivsena News : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांना प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर ठाकरे गटाकडून कारवाईनंतर गंभीर आरोप करण्यात आला आहे. केवळ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देऊन दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली नाही व त्यांच्या विरोधात अद्याप पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांना अभिवादन केले. यानंतर काही वेळातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल आले. त्यावेळी दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. याचवेळी आमदार अनिल परब, खासदार अनिल देसाई आणि महेश पेडणेकरही स्मृतिस्थळावर आले. या वेळी गद्दार गद्दार…अशा घोषणा देण्यात आल्या. गद्दारांना हाकलून द्या…अशा घोषणा देण्यात आल्या, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती.
दरम्यान, सोमवारी शिवाजी पार्कवरील राड्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीसाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
या राडा प्रकरणात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून दंगल घडवण्याचे गुन्हे दाखल केले आहेत, तर दुसऱ्या गटाला नोटीस का नाही? असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या प्रकरणातील चौकशीसंदर्भात आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत, असे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
(Edited by Sachin Waghmare)