शर्मिला वाळुंज
डोंबिवली : भारतीय जनता पार्टी आणि भाजपला (BJP) सहकार्य करणारे जे लोक आहेत. त्यांच्या मनात नक्की काय आहे? याचा विचार शांतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा असा सल्ला शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. फडणवीस यांना उप मुख्यमंत्री म्हणायला त्रास होतो असे वक्तव्य आमदार राणा यांनी केले आहे. याला उत्तर देताना जाधव यांनी सल्ला दिला आहे.
शिवसेना दिवा शहरच्यावतीने रविवारी दिवा येथे शिवसैनिकांचा संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री, शिवसेना आमदार भास्कर जाधव, कल्याण लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख सुभाष भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, वैशाली दरेकर, कविता गावंड, माजी नगरसेविका अंकिता पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी पुन्हा शिंदे गटाचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, अस वक्तव्य केलं होतं. काही मंडळी तर म्हणाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले म्हणून आम्हाला रडू कोसळले जे आजही थांबत नाहीये. जर त्यांचे सहकारी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान तर आहेच. पण एकनाथ शिंदे यांनीही विचार करण्याची गरज आहे, असे सुतोवाचही जाधव यांनी यावेळी केले आहे.
उद्धव ठाकरेंना येऊ देत, त्यांनी साद घातली तर बघू, असे विधान शर्मिला ठाकरे यांनी उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्यावरून केले आहे. यावरही भास्कर जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली. शर्मिलाताई ठाकरे काय बोलल्या हे मी ऐकले नाही. दुसरी गोष्ट कोणाच्या घरगुती विषयावर बोलणं हे आमच्या सारख्या माणसांना योग्य नाही.
पण आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सर्व बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यावेळेला त्यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा राहू पाहतोय. अशा वेळेला जर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा राग मनात न ठेवता याप्रसंगामध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहिले. तर त्यांचा निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आनंदच होईल.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. शिवसेना प्रमुखांचे नाव घेता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे म्हणून तुम्ही आम्हाला सांगता. दहीहंडी उत्सवात ठाण्यात त्यांनी आपल्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोटो लावले होते. पण एक तरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने ज्या शिवसेना प्रमुखांचे नाव तुम्ही घेता त्यांचा फोटो लावला होता का ? धर्मवीर आनंद दिघे यांचा तरी फोटो होता का ? याचा अर्थ भाजपाच्या पाठीमागे तुम्ही कशा पद्धतीने फरफटत गेलात आणि तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवला, हेच यावरुन दिसते.
नगरपालिका, महापालिकांच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पुन्हा नव्याने प्रभाग रचना होणार आहे. आधी झालेली प्रभाग रचना, वॉर्ड रचना, पडलेले आरक्षण पुन्हा बदलत आहेत, हे कोणा करीता. कोण आहे यांच्या पाठीमागे, त्यावेळी नगरविकास मंत्री कोण होते आता नगरविकास मंत्री कोण आहे. ज्यांनी स्वतःच्या खात्याने घेतलेला कारभार हा स्वतःच बदलायचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता असलेले सरकार भारतीय जनता पार्टीच्या हातातील कठपुतली आहे, हे लक्षात ठेवा. असे त्यांनी ठाकरे समर्थकांना सांगितले.
आताच्या मंत्रिमंडळाने घेतलेला एक तरी असा निर्णय दाखवावा, जो भाजपाला अपेक्षित नाही. सगळे निर्णय हे भाजपाच्या हिताचे घेतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत होते,असे ते म्हणतात. त्यांनी तसं करायचे काही कारण नाही, ते तर आपल्या विरोधातच होते. पण जे आपल्यासोबत राहून शिवसेना संपविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. गेले अनेक वर्षे सेनेसोबत राहून सेना संपविण्याचा एक कलमी कार्यक्रम ज्यांनी केला त्यांनी आज हे सरकार येऊन दीड महिना होत नाही तोच यांनी घेतलेले निर्णय यांना बदलायला लावले, याचा अर्थ हे विरोधात होते. बरोबर राहून कसा धोका द्यायचा याच उत्तम उदा. बदललेले निर्णय आहेत, असे सूचक विधान करत भास्कर जाधव यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.