Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री कपिल पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कपिल पाटलांच्याविरोधात उभे राहण्याची तयारी नीलेश सांबरे यांनी केली आहे. त्यातूनच त्यांनी कपिल पाटील यांच्यावर आरोप करताना त्यांनी विकासकामे केली नसल्याचा टोला लगावला आहे.
देशभरात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणावरही टीका करायची नाही. मात्र, वाईट काम करून कोणीही मोठा होत नसतो. मी काय काम केले हे दिसत नसेल तर चष्मा बदलावा, असे वक्तव्य केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्याविरोधात उभे राहण्याची तयारी करीत असलेल्या नीलेश सांबरे (nilesh Sambhre) यांच्याविरुद्ध बोलताना केले. स्वच्छ ग्रामीण अभियानाची माहिती द्यायला त्यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मी या लोकसभेत जवळपास 32 ते 33 हजार कोटी रुपयांची कामे केली आहेत. एवढी कामे गेल्या १० वर्षांत कोणीही केली नाहीत, असे सांगताना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढा निधी आला नाही, त्याहून अधिक निधी मी दिला. तो सदृश्य स्वरूपात दिसतो. जर तो दिसत नाही, असे कोणी म्हटले तर त्याला मी चष्मा बदलावा, असे सांगेन किंवा नेऊन दाखवेन.
इंडिया आघाडीतदेखील किती मारामाऱ्या सुरू आहेत, ते आपण पाहतो. मात्र, देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. विकासाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी जनतेमध्ये जो विश्वास निर्माण केला आहे त्यामुळे देशाची जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे मत केंद्रीयमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी व्यक्त केले. यावेळीदेखील 400 जागा घेऊन नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असे वक्तव्य त्यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाणे ग्रामीण भाग स्वच्छ करण्याचे अभियान
ठाणे जिल्ह्यातील 431 पंचायतींमध्ये डीप क्लीन मोहीम राबविण्यात येणार आहे. 3 जानेवारीला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा स्वच्छ करण्याचे अभियान ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषद , नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायत राज मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामस्थ, कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात हा प्रकल्प पहिल्यांदा राबविण्यात येत असून त्यानंतर संपूर्ण देशात हा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करणार...
शहापूरला जोपर्यंत बाहुली धरणाची योजना पूर्ण होत नाही, तसेच ज्या योजना जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्या असल्या तरी त्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, तोपर्यंत ग्रामीण भागात टँकरचा पुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
(Edited by Sachin Waghmare)