पिंपरीःपिंपरी-चिंचवडमध्ये एका मांजरामुळे बुधवारी (ता.२३)विजेचा मोठा खेळखंडोबा होऊन शेकडो लघुउद्योगांसह साठ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यावर धरणे धरीत भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge)यांनी काल (ता.२४) हा प्रश्न पॉंईट ऑफ इन्फर्मेशनव्दारे विधानसभेत उपस्थित केला होता.
आज (ता.२५) त्यांनी पुन्हा पॉंईट ऑफ इन्फर्मेशनव्दारेच युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine)पिंपरी-चिंचवडसह राज्यात परतलेल्या विद्यार्थ्यांच्या आपबितीकडे सभागृह आणि सरकारचे लक्ष वेधले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान,या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात बोलण्याची लांडगे यांनी आज हॅटट्रिक केली.पहिल्यांदा त्यांनी कोरोना काळात मानधनावर घेतलेल्या शहरातील रुग्णवाहिकाचालकांना कायम करण्याची मागणी नऊ दिवसांपूर्वी केली होती.
भाजप सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिकेने तसा ठराव करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, कंत्राटी कामगारांना अशा पद्धतीने थेट कायम करता येत नसल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. कारण तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर काल त्यांनी शहरातील विजेचा प्रश्न उपस्थित केला. तर आज युक्रेनमधून शहरात परतलेल्या ३४ विद्यार्थी व त्यांच्या पालकांची अडचण मांडली.
वैद्यकीय शिक्षण अर्धवट राहिलेल्या या विद्यार्थ्यांसाठी काही नियम शिथिल करून त्यांना ते आपल्या इथे पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. युक्रेनमधून देशात परतलेल्या अशा विद्यार्थ्यांत महाराष्ट्रातील संख्या मोठी असून त्यांचे शैक्षणिकच नाही तर आर्थिक नुकसानही होण्याच्या भीतीने ते व त्यांचे पालकही सध्या चिंतेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने हे विद्यार्थी देशात इंटर्नशिप करू शकतील,असा आदेश काढला आहे.त्या धर्तीवर राज्य सरकारनेही आदेश काढून ही परवानगी द्यावी, जेणेकरून सध्या मोठ्या चिंतेत असलेल्या या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळेल, असे लांडगे म्हणाले.
पॉंईट ऑफ इन्फर्मेशनव्दारे उपस्थित मुद्याची सबंधित खात्याचे सचिव थेट नोंद घेऊन कार्यवाही करतात. त्यामुळे लांडगे यांनी उपस्थित केलेल्या युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्य व भवितव्याचाही प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.