मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागातील आमदारांना कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा गुरुवारी अधिवेशनात केली. ही घरे सर्वपक्षीय आमदारांना देण्यात येणार आहेत. मात्र, या निर्णयाला भाजप, मनसेनेसह काही व्यक्तींकडून विरोध केला जात आहे.
या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray)सोशल माध्यमांवर ट्रोल झाले आहेत. एकीकडे एसटी कामगारांचा, कोविड भत्ते, शेतकरी, नोकर भरती यासाठी सरकारकडे पैसे नाही. असे असताना आमदारांना फुकट घर का ? असा सवाल मनसेनं केला आहे.
सैनिकांच्या कुटुंबियांना घरे द्या: राम कदम
भाजपचे नेते राम कदम यांनीही ठाकरे सरकारच्या या घोषणेवर टीका केली आहे. कदम म्हणाले, ''आमदारांना मोफत घरे देण्याआधी सरकारने कोरोना काळात लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, कंपाउंड यांना घरे द्यायला हवी होती. शाहिद सैनिकांच्या कुटुंबियांना घरे द्यायला हवी. कोणाला घरे देणे गरजेचे आहे हे सरकारने ठरवले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री यांना पत्र देणार आहोत,''
जनतेच्या पैशातून आमदारांना घर कशाला : मनसे
''अनेक आमदार बांधकाम व्यावसायिक आहेत. अनेक आमदारांची मुंबईत घर आहेत. मग यांना घर कशाला? स्वतःचे सरकार स्थिर करण्यासाठी आमदारांना घराची खिरापत वाटत आहात का?'' असा खोचक सवाल मनसेने ठाकरे सरकारला केला आहे. ''मुख्यमंत्र्यांना आमदारांना जर घर द्यायचेच असेल तर जनतेच्या पैशातून कशाला घर देता. स्वतःच्या मातोश्री Construction मधून मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना घराची खिरापत द्यावी,'' असा टोलाही मनसेनं लगावला
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, ''बीडीडी चाळींना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला काही हरकत नाही. पण, जे बाळासाहेबांचे विचार पाळत नाहीत त्यांनी नाव देऊन काय फायदा,''
दोन शर्ट, साडी सुद्धा द्या : प्राजक्त झावरे पाटील
''हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अपूर्ण निर्णय आहे. आपण इथंच थांबू नये. त्यांचं दारिद्र्य लक्षात घेऊन दर महिन्याला तीस किलो गहू, तीस किलो तांदूळ, पाच किलो तुरीची डाळ, दहा किलो तेल, एक बाटली खोबरेल तेल, दहा किलो साखर इत्यादी देण्याचाही विचार करावा. दर दसऱ्याला आणि मकरसंक्रांतीला धोतर जोडी, दोन पॅन्ट, दोन शर्ट, साडी सुद्धा दिलेच पाहिजेत. तातडीने ह्या सुधारणा व्हाव्यात,'' असा टोला मराठीमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी लगावला. ''फक्त सरकारच अभिनंदन करून जमणार नाही. तर कधी नव्हे ते टाळ्या वाजवून समर्थन देणाऱ्या विरोधी पक्षाचे देखील करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,'' असे त्यांनी म्हटलं आहे.
मुलांच्या लग्नासाठी तरतूद करा : सचिन सुरवसे
''दारिद्रय रेषेखाली येणाऱ्या सर्व आमदारांना फुकट मध्ये घर देणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचे अभिनंदन, खर तर आज कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत एवढं मोठं कार्य या सरकार ने केलं आहे. आता फक्त पुरवणी बिलात आमदाराच्या मुलांच्या लग्न कार्यासाठी अमुक अमुक तरतूद केली तर नवल नको वाटायला,,'' असे सचिन सुरवसे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत सांगितले की, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावे, आमदार असेपर्यंत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.