Mumbai News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्यांतील संघर्ष आता नवीन राहिला नाही. शिंदे गट वेगळा झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तेव्हापासून शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येक आमदारावर आक्रमकपणे हल्ला करीत ठाकरे गटाचाही बाजून लावून धरली आहे. अशातच आज रक्षाबंधनानिमित्त त्यांनी वेगळीच मागणी केली आहे. शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधननिमित्त ४० राख्या खरेदी केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे या राख्या बांधणार आहेत. "ते ४० जण माझे भाऊ असून त्यांना राखी बांधण्याची माझी इच्छा आहे. किमान एका तरी भावाने आज माझ्याकडे रक्षाबंधनासाठी यावं," अशी इच्छा अंधारे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ठाकरे गटात सामील झाल्यापासून सुषमा अंधारे कायम शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य करताना दिसत असतात. आपल्या भाषणातून कधी शेलक्या शब्दांत तर कधी आक्रमकपणे शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडतात. पण आज त्यांनी अचानक या आमदारांना राखी बांधण्याचे आवाहन केल्यामुळे यावर शिंदे गटाचे आमदार कशी प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, मंगळवारी त्यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाळीस आमदारांना साद घातली होती. ''कुठल्याही बहिणीला आपला भाऊ राखी पौर्णिमेला सोबत असावं, असं मनापासून वाटतं. महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करताना आम्ही विरोधक म्हणून भूमिका न मांडता भाऊ म्हणून भूमिका मांडत राहीलो. कारण यातल्या काहींनी निश्चितपणे अक्षम्य असा अपराध केला आहे. 'पण काहींच्या हातून नकळत चुका घडल्या आहेत आणि चुका दुरुस्त होऊ शकतात. आमच्या सगळ्याच भावंडांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वाट चुकलेल्या भावांना सन्मार्गाचा रस्ता सापडो हीच सदिच्छा.'' अशी पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.