बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur School case) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार (Akshay Shinde Encounter) केल्याप्रकरणी विरोधकांनी महाराष्ट्र सरकाला धारेवर धरले आहे. एन्काऊंटरवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना वाचवायचे असल्याने त्यांनी मुख्य पुरावा नष्ट केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संबधीत शाळा ही भारतीय जनता पक्षाशी संबधीत आहे. शाळेच्या पदाधिकारी हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
"एक सफाई कर्मचारी पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकावून त्यातून गोळी झाडतो, हे कोणाला पटेल का? सफाई कर्मचारी कधीपासून बंदूक चालवू लागला," असा प्रश्न राऊतांनी व्यक्त केला आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूबद्दल हळहळण्याचे काहीच कारण नाही, देशभरातील बलात्काऱ्यांना अशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे, याबद्दल दुमत नाही, असे राऊत म्हणाले.
सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
यानंतर अक्षय याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. शाळा प्रशासनाने हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठीच आमच्या मुलाला पैसे देऊन ठार मारले, असा आरोप अक्षय शिंदे याच्या नातेवाईकांनी केला आहे.
"अक्षयला जेलमध्ये टाकल्यानंतर आम्ही त्याला आतापर्यंत तीनवेळा भेटलो. प्रत्येक वेळी त्याने मला सांगितलं की मी काहीही केलं नाही. तळोजा जेलमधील कैदी आणि पोलिस मला खूप मारतात, असे त्याने सांगितले. माझा मुलगा बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करूच शकत नाही. कारण तो साध्या फटाक्यांच्या आवाजाला सुद्धा घाबरायचा. रस्ता ओलांडतानाही तो हात पकडायचा. कुणीतरी पैसे देऊन त्याला मारलं आहे," असा आरोप अक्षयच्या आईने केला आहे.
'बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो.
अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.